रणजी करंडक स्पर्धेची सुरुवात मोठ्या धडाक्यात झालेली आहे. हिमाचल प्रदेशकडून खेळणाऱ्या प्रशांत चोप्राने या हंगामातलं पहिलं त्रिशतक झळकावलं. धर्मशाळा येथे घरच्या मैदानावर खेळताना पंजाबविरुद्धच्या सामन्यात प्रशांतने मैदानात धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रशांतचा आज २५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे ही त्रिशतकी खेळी प्रशांतच्या कायम स्मरणात राहील यात काही शंका नाही. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक करणारा प्रशांत चोप्रा हा तिसरा रणजी खेळाडू ठरला आहे. अखेर ३३८ धावांवर प्रगत सिंहच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन प्रशांत माघारी परतला.

प्रशांत चोप्राच्या आधी इंग्लंडचे माजी खेळाडू कोलिन कोड्रे यांनी १९६२ साली आपल्या ३० व्या वाढदिवशी त्रिशतक झळकावलं होतं. यानंतर भारताचे दिवंगत खेळाडू रमण लांबा यांनी १९९५ साली वयाच्या ३५ व्या वर्षी त्रिशतक झळकावलं होतं. पहिल्या दिवशी प्रशांत २७१ धावांवर नाबाद राहिला. मात्र दुसऱ्या दिवशीच्या खेळात प्रशांतने आपलं त्रिशतक साजरं केलं. त्याच्या खेळीत ४४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

मात्र रणजी करंडक स्पर्धेत एका दिवशी सर्वाधीक धावा काढण्याचा विक्रम प्रशांतला मोडता आला नाही. महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांनी १९४८-४९ साली पहिल्या दिवशी २७७ धावांची खेळी केली. हा विक्रम मोडण्यासाठी प्रशांतला केवळ ७ धावांची गरज होती. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याने हा विक्रम भाऊसाहेब निंबाळकरांच्या नावेच अबाधित राहिला.