मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा २७ ऑक्टोबरपासून

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२१-२२चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम गुरुवारी निश्चित केला. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ५ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

करोना साथीमुळे गतवर्षी रणजी करंडक स्पर्धा होऊ शकली नाही. जैव-सुरक्षित वातावरणात ३८ संघांसह स्पर्धा आयोजित करणे कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र यंदा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटनंतर २७ ऑक्टोबरपासून मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेसह देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर १ ते २९ डिसेंबर या कालावधीत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होईल. महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. विनू मंकड करंडक १९ वर्षांखालील पुरुष आणि महिलांची स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होईल.

सहा गटांत ३८ संघांची विभागणी

वरिष्ठ पुरुषांच्या रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धासाठी ३८ संघांची सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी पाच एलिट गटांमध्ये प्रत्येकी सहा संघांचा समावेश असेल, तर एका प्लेट गटात आठ संघ असतील.