इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेची सांगता अवघ्या काही तासावर येऊन ठेपली आहे. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही तुल्यबळ संघांदरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहे. गुजरातच्या संघाची ही घरच्या मैदानावरील पहिली लढत ठरणार आहे. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी एका नेत्रदीपक समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार ए आर रहमान आणि बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ए आर रहमान यांच्यासोबत गायिका नीती मोहन आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये भारतीय क्रिकेटचा गेल्या सात दशकांतील प्रवास दाखविला जाईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहदेखील याठिकाणी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

आयपीएल २०२२ चा संपूर्ण समारोप समारंभ फक्त ४५ मिनिटांचा असू शकतो. आज (रविवार) सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी या कार्यक्रमाला सुरुवात होईल. रणवीर सिंग आणि ए आर रहमान यांच्या व्यतिरिक्त आमिर खानदेखील एका खास कारणासाठी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी आमिर खानअभिनीत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे. शनिवारी (२८ मे) संध्याकाळी या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणाऱ्या सर्व कलाकारांनी रंगीत तालीम केली.