Rashid Khan Breaks World Record: अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू रशीद खानने मोठा विश्वविक्रम मोडला आहे. सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात टी-२० फॉरमॅटमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे. आगामी आशिया चषक २०२५ च्या दृष्टीने तिन्ही संघांसाठी ही मालिका सराव म्हणून खेळवली जात आहे. या मालिकेत अफगाणिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान युएईविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या रशीद खानने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रशीद खानने टी-२० क्रिकेटमधील मोठा विश्वविक्रम मोडला आहे. रशीदने सर्वात कमी चेंडू, सर्वात कमी सामने खेळत हा मोठा विक्रम आपल्या नावे करत पहिलं स्थान गाठलं आहे. १ सप्टेंबरला युएईविरूद्ध सामन्यात कर्णधार असलेल्या रशीदने संघाच्या विजयात मोठी भूमिका तर निभावलीच. पण आशिया चषकापूर्वी वर्ल्डरेकॉर्ड मोडत मोठा धमाका केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आतापर्यंत न्यूझीलंडच्या टिम साउथीच्या नावावर होता, ज्याने १६४ विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाला विकेट्सचा हा आकडा गाठण्यासाठी १२६ सामने खेळावे लागले. तर त्याने आंतराराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २७५३ चेंडू टाकत हा विक्रम आपल्या नावे केला होता. पण आता रशीद खानने साऊथीला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रशीद खानने फक्त ९८ सामन्यांमध्ये २२४० चेंडूत १६५ विकेट्स घेतल्या आहेत. रशीद खानने साऊथीचा विश्वविक्रम मोडत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रशीद खानने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर हा विक्रम आपल्या नावे केला. अफगाणिस्तानने युएईविरूद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या होत्या.

अफगाणिस्तानकडून सदिकुल्लाह अटलने ५४ धावा आणि इब्राहिम झाद्रानने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. आता युएईला विजयासाठी १८९ धावांची आवश्यकता होती. पण रशीद खान आणि शराफुद्दीन अश्रफ यांच्या भेदक चेंडूंसमोर युएईचा संघ लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. युएईचा संघ फक्त १५० धावाच करू शकला.

रशीद खानला या सामन्यापूर्वी टिम साउदीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त ३ विकेट्सची आवश्यकता होती आणि त्याने युएईविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या. ४ षटकांत २१ धावा देऊन ३ विकेट्स घेत त्याने सर्वाधिक विकेट्सचा जागतिक विक्रम मोडला. आता रशीद खान टी-२०क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

रशीद खान – अफगाणिस्तान – १६५ विकेट्स
टीम साऊदी – न्यूझीलंड – १६४ विकेट्स
ईश सोढी – न्यूझीलंड – १५० विकेट्स
शाकिब अल हसन – बांगलादेश – १४९ विकेट्स
मुस्तफिजूर रहमान – बांगलादेश १४२ विकेट्स