भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाबद्दलचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. बीसीसीआयकडून रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. झहीर खानकडे भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना राहुल द्रविडकडे फलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री यांच्या नावाला पसंती दिली होती. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यावर प्रशिक्षक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबद्दल मोठी उत्सुकता होती.

आज (मंगळवारी) संध्याकाळी रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे वृत्त होते. मात्र बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिलेला नव्हता. ‘बीसीसीआयने प्रशिक्षकपदावर निर्णय घेतला नसल्याची माहिती प्रभारी सचिव अमिताभ चौधरी चौधरी यांनी दिली. बीसीसीआय नवीन प्रशिक्षकांच्या निवडीबद्दल चर्चा करत असल्याचे चौधरी यांनी सांगितले होते. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक कोण होणार, याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर प्रशिक्षक पदाबद्दलचा संभ्रम संपुष्टात आला असून बीसीसीआयकडून रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे अनिल कुंबळे यांची जागा रवी शास्त्री घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. भारताचा माजी गोलंदाज झहीर खानकडे संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी रवी शास्त्री भारतीय संघाचे संचालक असताना भारत अरुण यांच्या खांद्यावर गोलंदाजी प्रशिक्षक पदाची धुरा होती. मात्र आता त्यांच्या जागी झहीर खानला बीसीसीआयने संधी दिली आहे. बीसीसीआयकडून मुख्य प्रशिक्षक पदासाठी पाच जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत २०१४ ते २०१६ या कालावधीत संघाच्या संचालक पदाची सूत्रे सांभाळलेल्या रवी शास्त्री यांनी बाजी मारली. रवी शास्त्री यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात यावी, यासाठी कर्णधार विराट कोहली आग्रही होता.