साल २०११-१२. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे वर्ष. ऐतिहासिक असेच. कारण याच वर्षांतील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात विराट कोहली पहिल्यांदाच कर्णधारपदाच्या बोहल्यावर चढला. त्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीची नेतृत्वाची मक्तेदारीला मोडीत निघायला सुरुवात झाली होती. धोनीच्या दुखापतीमुळे कोहलीला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. आपल्या आक्रमक शैलीने त्याने ही जबाबदारी निभावली. धोनीही दुखापतीतून सावरत या दौऱ्यात दाखल झाला. एकेकाळी यश ज्याच्यामागे लागले होते, त्याच यशाने धोनीची साथ सोडली आणि धोनीला कसोटी कर्णधारपद सोडावे लागले. तोच ऑस्ट्रेलियाचा संघ आता भारताच्या दौऱ्यावर आला आहे आणि कोहली या प्रतिस्पर्धी संघाची आतुरतेने वाट पाहत असेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेतच, पण घरच्या मैदानात भारताच्या मदतीला खेळपट्टी आणि वातावरण हे अनुक्रमे १२ आणि १३वे खेळाडू असतील. पण ऑस्ट्रेलियाचा संघ कट्टर व्यावसायिक समजला जातो. त्यामुळेच भारतीय दौऱ्यासाठी ते फिरकी गोलंदाजांचा ताफा घेऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांच्या फिरकीची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे, हे नक्कीच.    

ऑस्ट्रेलियाला गेल्या आठ वर्षांमध्ये भारतात एकही सामना जिंकता आलेला नाही. दोन्ही संघांतील खेळाडू बदलले, पण ऑस्ट्रेलियाला विजय काही मिळवता आला नाही. त्यामुळेच या मालिकेतील विजय गेल्या १० वर्षांतील सर्वोत्तम असेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावरून ऑस्ट्रेलियासाठी हा मालिका विजय किती महत्त्वाचा आहे, हे समजता येऊ शकेल. दुसरीकडे भारताचा गेल्या १९ सामन्यांमध्ये एकदाही पराभव झालेला नाही. श्रीलंका, वेस्ट इंडिज यांना भारताने त्यांच्या देशात पराभूत केले, तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश यांना मायदेशात पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या मालिकेत पानिपत कोणाचे होणार, यावर साऱ्यांचे लक्ष असेल.

कोहली. भारताचा युवा सेनापती. सलग चार मालिकांमध्ये चार द्विशतकांचा मालक. सध्याच्या घडीला कोहली ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याला तोडच नाही. त्याच्या फलंदाजीला कलात्मकपणा नाही, असं काही म्हणतीलही. पण त्याच्याकडून होणाऱ्या सातत्याने धावा, सध्याच्या घडीला जगातील कोणताही फलंदाज करताना दिसत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या रडारवर तो असेल. कोहलीला झटपट बाद केल्यावर भारतीय संघ काही वेळा अधिक बचावात्मक होतो, हे दिसून आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिला वार कोहलीवर करेल. त्यानंतर त्यांच्या रडारवर असेल तो आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा हा फिरकी द्वयी. अश्विन हा भारतातला हुकमी गोलंदाज आहे. एकहाती सामना जिंकवून देण्याचे कसब त्याच्याकडे आहे. फिरकीच्या जोरावर त्याने बऱ्याच फलंदाजांना आपल्या चेंडूंवर नाचवले आहे. एकाच टप्प्यावर सातत्याने मारा करत चेंडूचा वेग कमी जास्त करण्यात जडेजा माहिर आहे. त्यामुळे त्याला खेळपट्टीशी जास्त देणेघेणे नसते. बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी या दोघांसाठी एक चांगला धडा ठरू शकते. बांगलादेशच्या संघात काही नावाजलेले फलंदाज नव्हते. पण खेळपट्टी फिरकीला पोषक नसल्यामुळे या दोन्ही फिरकीपटूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा हे दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत. पण त्रिशतकवीर करुण नायरच्या जागी संघात स्थान दिलेल्या अजिंक्य रहाणेकडून संघाला या मालिकेतही मोठय़ा अपेक्षा असतील.

भारताच्या दौऱ्यात फिरकी गोलंदाजीचे महत्त्व ऑस्ट्रेलियाला पटलेले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल होण्यापूर्वी दुबईमध्ये सराव करून आला आहे. त्यांनी दुबईमध्ये फिरकी आणि चेंडू उंच-सखल राहणाऱ्या खेळपट्टय़ांवर सराव केला आहे. त्याचबरोबर दोन फिरकी सल्लागारांबरोबर ते या दौऱ्यावर आले आहेत. लॅथन लिआन हे त्यांचे फिरकीचे मुख्य अस्त्र असेल. त्याने यापूर्वीही भारताच्या फलंदाजांना हैराण केले आहे. त्याला अ‍ॅश्टॉन अगरची यावेळी साथ मिळेल. त्याचबरोबर स्टीव्हन ओ’किफे आणि मिचेल स्वेप्सनहे युवा फिरकीपटूही या दौऱ्यासाठी सज्ज झाले असतील. कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलही फिरकीची बाजू सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर हा भन्नाट फॉर्मात आहे. तो किती कमी वेळात शतक झळकावेल, यावर सट्टा लागायला सुरुवातही झाली आहे. स्मिथ, मॅक्सवेलसारखे अनुभवी फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहे. शॉन आणि मिचेल हे मार्श बंधू काय कमाल दाखवतात, हे पाहावे लागेल. मिचेल स्टार्कसारखा वेगवान आणि जोश हेझलवूडसारखा अचूक मारा करणारा गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत.

दोन्ही संघ कागदावर तुल्यबळच दिसत आहेत. पण खेळपट्टी कधीपासून फिरकीला मदत करायला लागेल, हे पाहणे महत्त्वाचे असेल. त्यावरच भारताच्या फिरकीचे यश आणि त्याचा मालिकेवरील परिणाम अवलंबून असेल. जर खेळपट्टय़ा उशिरा फिरकीला साथ द्यायला लागल्या तर भारतावर सारे काही उटलण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. मालिकेतील चौथा सामना धरमशाला येथे आहे, तिथे भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक मदत मिळण्याची शक्यता असेल. स्मिथ, मॅक्सवेल, वॉर्नर या तिन्ही  खेळाडूंना आयपीएलमुळे भारतीय खेळपट्टय़ांचा व वातावरणाचा अंदाज आहे, तर भारताकडून कोहली, अश्विन यांची कामगिरी कशी होते, हे भारतासाठी महत्त्वाचे असेल. एकंदरीत सध्या तरी मालिकेचे भवितव्य वर्तवणे सोपे नसेल.

ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंची फौज

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना भारतामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मग तो शेन वॉर्न असो किंवा त्याच्यानंतर भारताच्या दौऱ्यावर आलेले जेसन क्रेझा, नॅथन हाऊरित्झ, झेव्हियर डोहर्टी, नॅथन लिऑनसारखे फिरकीपटू. पण तरीही ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यावर येताना फिरकीपटूंची फौज आणली आहे. लिआन, अगर यांच्याबरोबर स्टीव्हन ओ’किफे आणि मिचेल स्वेप्सन हे फिरकीपटू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यापैकी लिऑनलाच फक्त भारतात कसोटी खेळण्याचा चांगला अनुभव आहे. पण तरीही त्यांनी हे फिरकीपटू भारतात आणण्याचे कारण म्हणजे आकडेवारी. २०००-०५ या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात सात कसोटी सामने खेळला. या सात कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ७६ बळी वेगवान गोलंदाजांनी तर ३५ बळी फिरकीपटूंनी घेतले होते. पण त्यानंतर २००८-१३ या कालावधीमधील भारतातील दहा कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी ८२ तर फिरकीपटूंनी ५५ बळी मिळवले होते. दोन्ही आकडेवारी जुळवून पाहिल्यास गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी भारतात तुलनेत जास्त बळी मिळवले आहेत.

 

प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com