Ravindra Jadeja WTC Record: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात ३० धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या खेळाडूंनी अखेरच्या विकेटपर्यंत कडवी झुंज दिली. या सामन्यात भारताने सामना जिंकला नसला तरी अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
जडेजाने या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, परंतु भारताचा अखेर पराभव झाला. गोलंदाजीच्या बाबतीत, पहिल्या डावात जडेजाला विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या डावात त्याने शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने फलंदाजी करताना २७ धावा आणि दुसऱ्या डावात १८ धावा केल्या.
दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. या चार विकेट्ससह त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १५० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात १५० बळी घेणारा तिसरा भारतीय आणि एकूण सातवा गोलंदाज ठरला. पण त्याने असा पराक्रम केला आहे जो आतापर्यंत WTCमध्ये इतर कोणत्याही खेळाडूने केलेला नाही.
अष्टपैलू रवींद्र जडेजा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात २००० पेक्षा जास्त धावा करणारा आणि १५० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण ४ खेळाडू असे आहेत, ज्यांनी १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि १०० विकेट्सही घेतल्या आहेत. पण रवींद्र जडेजा वगळता, असा कोणताही खेळाडू नाही ज्याने WTC मध्ये अशी कामगिरी केली आहे.
रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ४७ सामन्यांमध्ये ४३.६५ च्या सरासरीने २५३२ धावा आणि २६.७७ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत. तर रवींद्र जडेजा अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत अवघ्या अडीज दिवसात द. आफ्रिकेने ३० धावांनी विजय मिळवला. यासह तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. गेल्या १५ वर्षांत दक्षिण आफ्रिकेचा भारतीय भूमीवर हा पहिलाच कसोटी विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी १२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, भारत ९३ धावांवर सर्वबाद झाला.
