Ravindra Jadeja Unique Record IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाकडून उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. दिवसाच्या सुरुवातीला केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरत इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. यादरम्यान रवींद्र जडेजाने एक मोठा दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.
रवींद्र जडेजा इंग्लंडविरूद्ध मालिकेत बॅटने भारतासाठी तारणहार ठरला. जडेजाने ४ सामन्यांमध्ये ५ अर्धशतकं झळकावली आहेत. जडेजाने चौथ्या कसोटीत ४ विकेट्स घेतले आहेत. यानंतर फलंदाजीला आल्यानंतर जडेजाने झटपट अर्धशतक झळकावलं आणि सुंदरला चांगली साथ देत दोघांनी शतकी भागीदारी रचली आणि इंग्लंडच्या मँचेस्टर कसोटी विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.
रविंद्र जडेजाने घडवला इतिहास
रवींद्र जडेजाने फलंदाजी करत इतिहास घडवला आहे. चालू मालिकेत जडेजाने ५ अर्धशतकं झळकावली आहेत. यासह त्याने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह रवींद्र जडेजा हा इंग्लंडच्या भूमीवर १ हजार धावा आणि ३० अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
आशियातील ७ फलंदाजांनी इंग्लंडच्या भूमीवर १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. १८ गोलंदाजांनी ३०+ विकेट घेतले आहेत, परंतु अष्टपैलू जडेजा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एकाचवेळी हे दोन्ही विक्रम आपल्या नावे केले आहेत. याशिवाय इंग्लंडमध्ये ६ ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १ हजारपेक्षा जास्त धावा करणारा जडेजा गॅरी सोबर्स यांच्यानंतरचा पहिला खेळाडू आहे.
कसोटी मालिकेत सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम महान सर गॅरी सोबर्स यांच्या नावावर होता. गॅरी सोबर्स यांनी ५ अर्धशतकं झळकावली होती. आता रवींद्र जडेजानेही त्याची बरोबरी केली आहे. जर जडेजाने शेवटच्या कसोटी सामन्यातही अर्धशतक झळकावले तर तो या यादीत अव्वल स्थानावर असेल. व्हीव्हीएस लक्ष्मणने २००२ मध्ये भारतासाठी एका मालिकेत ५ अर्धशतकं झळकावली होती.