‘सामना हरल्यानंतर डिनरला ये’, जडेजाचे मॅथ्यू वेडला प्रत्युत्तर

धरमशालाच्या मैदानावर तिसरा दिवस जडेजाने चांगलाच गाजवला.

Ravindra Jadeja
जडेजा आणि वृद्धीमान साहाने मैदानात जम बसवल्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकी नऊ आले होते.

भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडच्या स्लेजिंगला चांगलेच प्रत्युत्तर दिले. कसोटी सामना गमावशील त्यानंतर माझ्यासोबत डिनरला ये, असे निमंत्रण देऊन जडेजाने मॅथ्यू वेडला खोचक टोला लगावला.

धरमशालाच्या मैदानावर तिसरा दिवस जडेजाने चांगलाच गाजवला. जडेजा आणि वृद्धीमान साहाने मैदानात जम बसवल्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकी नऊ आले होते. जडेजा-साहा जोडी फोडण्यात अपयश येत असल्याने ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचाही मार्ग अवलंबून पाहिला. यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने जडेजाला डिवचण्यास सुरूवात केली. मॅथ्यू वेडच्या वारंवार शेरेबाजीनंतर जडेजाने त्याला ताकीद देखील दिली. ‘तू सुरूवात केलीस तर मी शेवटत करेन’, असे जडेजाने मॅथ्यू वेडला सांगितले. पण तरीसुद्धा मॅथ्यू वेड काही ऐकण्यास तयार नव्हता. यष्टीच्या मागून जडेजाची एकाग्रता भंग करण्यसाठी त्याची शेरेबाजी करणे काही थांबत नव्हते. मग जडेजाने मॅथ्यू वेडला आपल्या स्टाईलने ‘अष्टपैलू’ प्रत्युत्तर दिले. सामना हारल्यानंतर तू डिनर ये, असे निमंत्रणच जडेजाने मॅथ्यू वेडला दिले. दोघांमधील शाब्दीक चकमकी थांबविण्यासाठी अखेर पंचांना हस्तक्षेप करावा लागला होता. मैदानात मॅथ्यू वेडसोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार जडेजाने पत्रकार परिषदेत कथन केला.

 

दरम्यान, जडेजाने संपूर्ण मालिकेत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कमाल करुन दाखवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचा खरा हिरो ठरला. जडेजाने दाखविलेल्या अष्टपैलूच्या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव भारताने अवघ्या १३७ धावांवर गुंडाळला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दिलेले १०६ धावांचे कमकुवत आव्हान भारताने ८ गडी राखून गाठले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ravindra jadeja on matthew wade sledge will have dinner together once you lose