विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने देशातच नव्हे, तर परदेशी भूमीवरही विजय मिळवला आहे. त्याच वेळी, माही भारताचा एकमेव कर्णधार होता, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या. मात्र विराट आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये संघासाठी एकही विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला आहे आणि त्याच्या कर्णधारपदावर हा सर्वात मोठा डाग आहे. या दोन दिग्गज कर्णधारांमध्ये सर्वोत्कृष्ट कोण यावर चर्चा नेहमी होत असते. दरम्यान, धोनी आणि विराट या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जडेजा म्हणाला, “मला वाटते की दोघेही कर्णधार म्हणून वेगळे आहेत. मला वाटते की धोनी भाई खूप शांत आहे, पण विराट मैदानावर अधिक आक्रमक आणि पॉझिटिव्ह कर्णधार आहे. दोघांचेही संघाचे नेतृत्व करण्याची स्वतःची शैली आहे.”

जडेजाने कबूल केले की त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीची आठवण येते. तो म्हणाला, ”होय, मी धोनीला पूर्णपणे मिस करतो कारण तो मला योग्य दिशेने मार्गदर्शन करत असायचा. जर मी मैदानावर योग्य गोष्टी करत नसलो, तर तो माझ्याशी बोलायचा आणि मला सांगायचा की मला आणखी काय काम करण्याची गरज आहे. तो नेहमी माझ्याशी बोलत असे आणि आमचे बंधन १२ वर्षांचे आहे. मला त्याची आठवण येते.”

हेही वाचा – IPL सुरू होण्यापूर्वी एका संघाचं ट्विटर अकाऊंट झालं हॅक; ‘त्या’ ट्वीटबद्दल मागावी लागली माफी!

धोनी आणि जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी एकत्र खेळताना दिसतील. यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात हे दोघे एकत्र खेळताना दिसतील. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील जडेजाची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने ७ सामन्यांमध्ये १३१ धावा केल्या होत्या तर गोलंदाजीत ६ विकेट्स घेतल्या होत्या. जडेजाने आरसीबीविरुद्ध धमाकेदार फलंदाजी केली आणि हर्षल पटेलच्या एका षटकात ३६ धावा फटकावल्या होत्या.