दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा

महाराष्ट्राच्या दिनेश कांबळेला रौप्य; भारताला १२ पदकांसह तिसरे स्थान

नेपाळमधील काठमांडू येथे रविवारी झालेल्या १२व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सेनादलाच्या रवींद्र कुमाल मलिक याने सर्वसाधारण वैयक्तिक विजेतेपदाचा मान पटकावला. भारताने या स्पर्धेत ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि १ कांस्यपदक अशी एकूण १२ पदकांची कमाई करत तिसरे स्थान मिळवले. महाराष्ट्राच्या दिनेश कांबळेला ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळाले.

आसामच्या दिपू दत्ता याने ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत भारताचे खाते उघडल्यानंतर ६५ किलो वजनी गटात दिनेश दुसरा आला. ७० किलो वजनी गटात भारताच्या सॅव्हियो हेन्रिक्स याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ७५ किलो गटात धर्मेद्र कुमार याने दुसरा क्रमांक पटकावत भारताच्या खात्यात दुसऱ्या रौप्यपदकाची भर घातली. त्यानंतर ८० किलो वजनी गटातून रवींद्र मलिकने अफगाणिस्तानच्या मोहम्मद साखी आणि नेपाळच्या मिलन सिजापती यांचे कडवे आव्हान मोडीत काढत सुवर्णपदक जिंकले. ८५ किलो गटात मणिपूरचा ऋषिकांत सिंग सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. ९० किलो वजनी गटात ऋषी अत्रेय याने रौप्यपदक प्राप्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक सुवर्णपदकांवर वर्चस्व मिळवणाऱ्या अफगाणिस्तानने  ५३५ गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. यजमान नेपाळ (४४५ गुण) दुसरा तर भारत (३८० गुण) तिसरा आला. वैयक्तिक विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत पंचांनी एकमताने रवींद्र मलिकला विजयी घोषित केले. महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात निशरीन पारीख तिसरी आली तर अ‍ॅथलेटिक फिजिक प्रकारात निशा भोयर हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.