सोमदेव देववर्मन याच्या नेतृत्वाखालील अकरा खेळाडूंनी अखिल भारतीय टेनिस संघटनेविरुद्ध (एआयटीए) सुरू केलेले आंदोलन मागे घेतले असून इंडोनेशियाविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.
या खेळाडूंनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन एआयटीएने दिल्यानंतर या खेळाडूंनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बंगळुरू येथे ५ ते ७ एप्रिलदरम्यान इंडोनेशियाविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस लढतीत सोमदेव याच्यासह भारताच्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध झालेल्या डेव्हिस लढतीत १-४ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.
एआयटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोन्मय चटर्जी यांनी सांगितले, ‘‘आम्ही सर्व खेळाडू इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीकरिता उपलब्ध असल्याचे सोमदेव याने ईमेलद्वारे कळविले आहे. मात्र लढतीसाठी कर्णधार व सपोर्ट स्टाफची निवड करताना या बंडखोर खेळाडूंनी घातलेल्या अटी मान्य कराव्यात, असे त्यांनी कळविले आहे.’’