रेड बुलचे प्रतिनिधित्व करताना चार वेळा विश्वविजेता ठरलेला फॉम्र्युला-वन ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल या मोसमानंतर रेड बुलला सोडचिठ्ठी देणार आहे. वेटेल फेरारी संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
रेड बुलचे अध्यक्ष ख्रिस्तियान हॉर्नर यांना वेटेलनी आपला निर्णय कळवला असून रेड बुलने शनिवारी जपान ग्रां. प्रि.च्या पात्रता शर्यतीआधी संघाचा निर्णय जाहीर केला. रेड बुलने वेटेलच्या जागी टोरो रोस्सोच्या डॅनियल क्वायटची निवड केली आहे. वेटेलचा पुढील मोसमापर्यंत रेड बुलशी करार होता. पण फेरारीशी बोलणी सुरू असल्यामुळे वेटेलने रेड बुलला अलविदा केला.
वेटेलच्या या निर्णयामुळे आता फेरारीचा ड्रायव्हर फर्नाडो अलोन्सोवरील दडपण वाढले आहे. दुसऱ्या संघात स्थान मिळवण्यासाठी अलोन्सोने हातपाय हलवण्यास सुरुवात केली आहे.