– पै. मतीन शेख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन बटणांचा चमकदार ढगळ कुर्ता, पांढरं शुभ्र धोतर, पायात कोल्हापूरी पायताण आणि डोक्याला तुऱ्याचा सुंदर फेटा…अशा वेशात भारदस्त पिळदार मिशाच्या रुबाबाने तरुणांना ही लाजवेल असं तेजस्वी गोरंपान देखणं रुप,  तब्बल सहा फुट उंचीचा, बुरुज बंध ताकदीचा, पहाडासारखा दिसणारा माणुस अखेर आज आपली साथ सोडून गेला. महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर उर्फ आबांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतली कुस्ती आज खऱ्या अर्थाने पोरकी झाली. पैलवान म्हणून मला आबा जेवढे समजले ते आज शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न करतो.

कुस्ती मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून आबा दाखल झाले की सबंध कुस्ती शौकिन नेते मंडळीच्या नजरा गणपत आबांकडे वळायच्या. कुस्तीच्या फडातलं एक आकर्षणच असायचं ते…फडात सुरु असणार्‍या पैलवानांच्या लढती सोडुन सर्वजण आबांकडेच पाहत बसायचे. त्यांच्या तेजस्वी बलदंड रुपात जणु प्रती हनुमानच दिसायचा त्यांना. मैदानात हलगी वाजायची,आबांचा हात तुऱ्यांनी सत्कार-सन्मान व्हायचा आणि आबा आपले दोन्ही हात उंचावत कुस्ती शौकिनांना अभिवादन करायचे की प्रेक्षकांमधुन आबांच्या सन्मानार्थ टाळ्याचा कडकडाट झालाच म्हणून समजा. परंतु आबा आता मैदानात परत कधीच दिसणार नाहीत. तो टाळ्यांचा कडकडाट पुन्हा कधीच कानी पडणार नाही कारण महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्माचार्य हिंदकेसरी गणपत आंधळकर आता पडद्याड गेलेत, पण हे मान्य करायला सध्या मन धजत नाही. त्यांचं ते चिरंजीवी, बहारदार, रांगड पैलवानी रुप, त्यांची कुस्तीतील ऐतिहासिक कामगिरी, त्यांचं तांबड्या मातीवर असणारं नितांत प्रेम, सर्व पैलवानांसाठी असणारी आस्था या सर्व गोष्टी आजही ध्यानी मनी तरळत आहेत.

आबांच्या साथीला त्यांच्या सारखेच देखणे मल्ल हिंदकेसरी मारुती माने होते. या दोघांच्या महान जोडीला बरोबर पाहण्याची संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्तीशौकीनांना सवय झाली होती. या दोघांच्या उपस्थितीने कुस्तीच्या फडाला शोभा यायची. सर्व युवा पैलवानांना या जोडीला पाहुन कुस्ती लढायला हुरूप यायचा, परंतु काही वर्षापुर्वी मारुती (भाऊ) माने निवर्तले आणि ही जोडी फुटली. यानंतर आबा एकटेच मैदानात उपस्थित असायचे. मारुती माने आपल्या सोबत नाहीत याची खंत त्यांना नेहमी असायची आणि आता तर गणपत आबा ही आपल्यातुन निघुन गेले. गरिब शेतकरी कुटुंबात जन्मलेले, ऐन तारुण्यात काही दिवस मोल मजुरी करुन दिवस काढणारे आबा कुस्तीच्या ओढीने कोल्हापुरात दाखल झाले आणि थेट ऑलिम्पिक पर्यंत पोहचले. त्यांच्या हा थक्क करणारा प्रवास जेव्हा-जेव्हा जेष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारींच्या तोंडुन ऐकायला मिळायचा तेव्हा आबांसाठी असणारा आदर आणखीनच वाढत जायचा.

आबांना माती बरोबरच मॅटवरील कुस्तीचे तंत्र चांगलच अवगत होतं. या जोरावरच त्यांनी १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत फ्रिस्टाईल आणि ग्रिको रोमन या दोन्ही प्रकारात पदक मिळवुन इतिहास रचला होता. पारंपारिक कुस्ती बरोबरच आधुनिक कुस्ती ही मल्लांनी आत्मसात करावी तरच ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील, असा आबांचा अट्टाहास असायचा. कोल्हापूर या कुस्ती पंढरीचा पांडुरंग म्हणूनच गणपत आंधळकरांनी अनेक मल्लांना घडवले, त्यांच्यावर चांगला संस्कार घडवला. कुस्ती हा पारंपरिक इर्षेचा खेळ, हा पैलवान त्या तालीम संघाचा, तो पैलवान त्या वस्तादांचा पठ्ठ्या अशी निकोपी इर्षा, खुन्नस, प्रसंगी राजकारण ही कुस्तीत असतं. पण आबा या पलिकडे होते, अखंड महाराष्ट्राची पैलवान पोरं त्यांना आपली शिष्य वाटायची. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी पंजाब हरियाणाच्या कानाकोपऱ्यातुन अनेक मल्लांनी कोल्हापूरच्या आखाड्यात येवून आबांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. ते सर्वांशी आस्थेने बोलायचे मात्र कुस्तीच्या सरावात कोणालाही हयगय करु देत नव्हते, तसा त्यांचा आदरयुक्त दराराच होता.

आबांच्या कुस्तीप्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. वयाची ८० वर्ष पार केल्यानंतरही ते दररोज पैलवानांचा सराव घेण्यासाठी, कुस्तीचं अस्सल तंत्र शिकवण्यासाठी कोल्हापूरच्या न्यु मोतीबाग तालमीच्या आखाड्यात स्वतः हातात छडी घेवुन हजर असायचे. दिसायला धिप्पाड, रांगडी देह पण मनाने मायाळु आणि हळवे व पैलवान मुलांबद्दल आस्था बाळगणारे होते आबा…कुस्तीच्या फडात त्यांचा आशिर्वाद घ्यायला गेलं की ते मायेनं पाठीवर हात फिरवायचे. प्रत्येक मल्लाच्या खांद्यावर हात टाकत त्याला जवळ करायचे, आबा मितभाषी होते परंतु स्मितहास्य करणारा तेजस्वी चेहरा मल्लांना नवी उर्जा द्यायचा. त्यांचं दर्शन घेतल्यावर सर्व मल्लांना जणु हनुमानाचचं दर्शन घेतल्यासारखं वाटायचं.

आबांची हनुमानाबरोबरच राजर्षी शाहू महाराजांवर अपार निष्ठा होती. शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला म्हणूनच ही कुस्ती टिकली आणि आपण मोठ्ठे पैलवान होऊन या तांबड्या मातीची सेवा करु शकलो अशी निखळ भावना त्यांची होती. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार देवुन त्यांना सन्मानित करण्यात आलं तेव्हा आबांनी हा सन्मान माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याचे उद्गार काढले होते. आबांची तेजस्वी-भारदस्त, रांगड्या पिळदार मिशा असलेली पैलवानी छबी टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकारांची होणारी धडपड मी नेहमी पाहिली आहे. छायाचित्रकार आपला फोटो घेतोय हे पाहुन आबा त्याच्याकडे पाहायचे आणि चेहर्‍यावर स्मितहास्य आणत जरा ताठ, ऐटीत बसायचे आणि फोटो काढून झाल्यावर त्या फोटोग्राफरला हात जोडत आभार व्यक्त करायचे. इतका हा सह्रदयी, रांगडा पण मनाने साधा असणारा पैलवान…खरंच आबा तुमच्या जाण्यामुळे आमची कुस्ती पोरकी झाली आज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renewed wrestler from maharashtra ganpatrav aandhlkar pass away special blog on his career
First published on: 17-09-2018 at 18:27 IST