स्वीडन-आर्यलड प्रजासत्ताक यांच्यातील लढत बरोबरीत

गोल करणे हा फुटबॉलचा मूलमंत्र. मात्र हा गोल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलजाळ्यात साकारणे आवश्यक असते. आर्यलडच्या सिरान क्लार्कने मिळालेल्या उत्तम क्रॉसवर गोल केला. मात्र तो स्वत:च्या गोलजाळ्यात केला. स्वयंगोलमुळे स्वीडनचे खाते उघडले आणि बरोबरी झाली. उर्वरित वेळेत गोलची भर घालता न आल्याने सामना बरोबरीत सुटला.

होलाहनने ४८व्या मिनिटाला हाफ व्हॉलीद्वारे गोल करत आर्यलडचे खाते उघडले. यानंतरही आर्यलडच्या खेळाडूंनीच दमदार आक्रमणावर भर दिला. स्वीडनचे गोल करण्याचे प्रयत्न आर्यलडने हाणून पाडले. ७१व्या मिनिटाला स्वीडनच्या झाल्टान इब्राहिमोव्हिकच्या अफलातून क्रॉसच्या जोरावर आर्यलडच्या सिरान क्लार्क चेंडू गोलजाळ्याचा बाजूला सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या डोक्याला लागून गोलजाळ्यात गेला. आयत्या मिळालेल्या या गोलचा स्वीडनच्या खेळाडूंनी जल्लोष केला. स्वयंगोलमुळे आर्यलडच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे जाणवले. चेंडूवर नियंत्रण राखता न आल्याने त्यांना उर्वरित वेळेत गोलही करता आला नाही आणि सामना बरोबरीत सुटला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लक्ष

सेंट इटिन : गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी प्रसिद्ध आणि दिमाखदार फॉर्मात असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो चषकातील आइसलँडविरुद्धच्या लढतीत पोर्तुगालसाठी हुकमी एक्का आहे. रोनाल्डोच्या नेतृत्त्वाखालील पोर्तुगालचा संघ दमदार सलामीसह सुरुवात करण्यासाठी आतूर आहे. २०१२ मध्ये उपांत्य फेरीत स्पेनने पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आणले होते.

१० चाहत्यांवर खटला दाखल होणार

मार्सेल : इंग्लंड आणि रशिया यांच्यातील युरो चषकाच्या लढतीनंतर हिंसक धुडगूस घालणाऱ्या रशियाच्या दीडशेहून अधिक पाठीराख्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया यांच्या एकंदर दहा चाहत्यांवर खटला दाखल करण्यात येणार असल्याचे वकिलांनी सांगितले. इंग्लंड आणि रशिया यांच्यातील लढत शनिवारी बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे खेळभावनेला गालबोट लागले. या दुर्दैवी घटनेत इंग्लंडचे ३५ पाठीराखे जखमी झाले. तीनजणांची प्रकृती स्थिर आहे. फ्रान्समध्येच १९९८ साली झालेल्या हिंसक घटनेनंतरचा हा सगळ्यात मोठा हिंसक उद्रेक आहे. ‘‘हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या इंग्लंडच्या चाहत्याची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे. रशियाचे समर्थक अशा घटनेसाठी तयारच होते,’’ असे फिर्यादी वकील ब्राइस रॉबिन यांनी सांगितले.