अपुरे उत्पन्न असतानाही येथील एका ऑटोरिक्षा चालकाने आपल्या राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज मुलीच्या लग्नासाठी राखून ठेवलेल्या पैशांमधून तिच्यासाठी ५ लाख रुपयांची जर्मन बनावटीची रायफल खरेदी केली आहे!
अहमदाबादच्या मित्तल गोहिल हिला नेमबाजीची आवड असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतासाठी पदके जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे. ते तिला पूर्ण करता यावे यासाठी तिचे वडील मणिलाल (५०) यांनी आपली आयुष्यभराची कमाई खर्च करण्याचा निर्णय घेतला.
मित्तलने छंद म्हणून २०१२ साली नेमबाजी सुरू केली. रायफल विकत घेण्याची ऐपत नसल्याने ती रायफल क्लबमधून किंवा इतरांकडून रायफल वापरायला घेत असे, पण तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके मिळवायची असतील, तर तिला उत्कृष्ट दर्जाची रायफल आवश्यक असल्याचे मला लक्षात आले, असे मणिलाल यांनी सांगितले.
प्रत्येक पित्याप्रमाणे मीही मित्तलच्या लग्नासाठी पैसे जमवत होतो, पण तिला रायफल आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर ५ लाख रुपये किमतीची ५० मीटर रेंज असलेली जर्मन बनावटीची रायफल खरेदी करण्यासाठी हे पैसे वापरण्याचे मी ठरवले.
मित्तल आणि दोन मुलांसह गोमतीपूर भागातील एका चाळीत राहणारे गोहिल हे दररोज ऑटोरिक्षा चालवून सुमारे ५०० रुपये कमावतात. केबल नेटवर्कचा व्यवसाय करणारा त्यांचा मुलगा जैनिश याची त्यांना मदत होते.