आयपीएलच्या सहाव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगकडे देण्यात आली आहे. पाचव्या हंगामात सचिन तेंडुलकरने कर्णधारपदाचा भार हरभजन सिंगकडे सोपवला होता, पण या वेळी हरभजन सिंगला कर्णधारपदावरून दूर करीत पॉन्टिंगला कर्णधारपद देण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आयपीएलच्या सहाव्या हंगामाच्या लिलावाच्या वेळी मुंबई इंडियन्सने पॉन्टिंगला ४ लाख अमेरिकन डॉलर्स देत संघात घेतले होते.
आगामी आयपीएलच्या मोसमासाठी पॉन्टिंगला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. हा निर्णय नवनिर्वाचित मुख्य मार्गदर्शन अनिल कुंबळे, मुख्य प्रशिक्षक जॉन राइट आणि ‘आयकॉन’ खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्याशी सल्लामसलत करून घेण्यात आला आहे, असे मुंबई इंडियन्सने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
पॉन्टिंगकडे कर्णधारपदाचा दांडगा अनुभव आहे, त्याचबरोबर आयपीएलमध्येही तो खेळला आहे. पॉन्टिंगला संघात घेऊन कर्णधार करण्याची माझी आणि सचिनची कल्पना होती, असे कुंबळेने सांगितले.
या नवीन भूमिकेबद्दल पॉन्टिंग म्हणाला की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हा माझा सन्मान आहे. यासाठी संघाच्या व्यवस्थापनाचे मी आभार मानतो. मुंबई इंडियन्सच्या संघात भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. माझ्यापरीने कर्णधारपद भूषवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन.
मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील पहिला सामना ४ एप्रिलला बंगळुरू येथे होणार आहे.