Ricky Ponting : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे सोडलं आहे. गेल्या १३ वर्षांपासून हा विक्रम अबाधित होता. आता जो रूटने मँचेस्टरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध खेळताना हा विक्रम मोडून काढला आहे. या विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १५९२१ धावा करण्याची नोंद आहे. रूटला हा सर्वात मोठा विक्रम मोडून काढण्यासाठी जवळपास २५०० धावा करायच्या आहेत. दरम्यान रूटने रिकी पाँटिंगसमोरच हा विक्रम मोडून काढला.
ज्यावेळी जो रूटने ही विक्रम खेळी केली त्यावेळी रिकी पाँटिंग स्काय स्पोर्ट्सवर समालोचन करत होता. तो म्हणाला, “ जो रूटचं खूप खूप अभिनंदन. या यादीत तो आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. हा ऐतिहासक क्षण आहे. रवी शास्त्री जसं तुम्ही म्हणाले, आता केवळ सचिन तेंडुलकर त्याच्यापुढे आहे. त्याला अजून २५०० धावांची गरज आहे. पण त्याने गेल्या ४-५ वर्षांत जशी कामगिरी केली आहे ते पाहता हा विक्रम न मोडला जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.”
या मालिकेत जो रूटच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने याआधी देखील शतक झळकावलं आहे. मँचेस्टरच्या मैदानावर झळकावलेलं हे शतक या मालिकेतील दुसरं शतक ठरलं आहे. त्याने या डावात फलंदाजी करताना १५० धावांची खेळी केली.
या खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ५०० धावांचा डोंगर उभारला आहे. मुख्य बाब म्हणजे या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. आता एकाच खेळीसह तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने या विक्रमात रिकी पाँटिंगसह, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांना मागे सोडलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर -१५९२१
जो रूट -१३३८९
रिकी पाँटिंग -१३३७८
जॅक कॅलिस – १३२८९
राहुल द्रविड – १३२८८