Rinku Singh Century in Just 45 Balls: आशिया चषक २०२५ च्या टी-२० संघात फिनिशरच्या भूमिकेत रिंकू सिंहला संधी मिळाली आहे. रिंकू सिंह गेल्या काही काळापासून वाईट फॉर्मातून जात होता. यूपी टी-२० लीगमध्ये खेळताना रिंकूने वादळी फटकेबाजी करत आपला फॉर्म परत मिळवला आहे. रिंकूने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत शतकी खेळी केली आहे.

रिंकूने गौर गोरखपूर लायन्स संघाविरुद्ध खेळताना दमदार फलंदाजी केली आणि शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गोरखपूर लायन्सने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या. रिंकूच्या दमदार खेळीमुळे मेरठ मॅव्हेरिक्स संघाने लक्ष्य सहज गाठले.

रिंकू सिंहची १०८ धावांची स्फोटक खेळी

रिंकू सिंहच्या नेतृत्वाखालील मेरठ मॅव्हेरिक्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आकाश दुबे आणि स्वस्तिक चिकारा ही सलामी जोडी झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर ऋतुराज शर्मा आणि माधव कौशिक यांनाही मोठी खेळी करता आली नाही. यासह फक्त ३८ धावांत चार विकेट गमावल्यानंतर संघ अडचणीत आला. त्यानंतर रिंकू सिंहने क्रीजवर पाऊल ठेवलं आणि आपल्या वादळी खेळी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं.

रिंकू सिंहने ४८ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. रिंकूने अवघ्या ४५ चेंडूत शतक झळकावलं. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २२५ होता. गौर गोरखपूर लायन्सच्या गोलंदाजांसमोर रिंकू सिंहने मोठमोठे फटके खेळत त्यांची धुलाई केली. रिंकू सिंहने साहब युवराजसह मिळून फक्त ६५ चेंडूत १३० धावांची नाबाद भागीदारी रचत गोरखपूरच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

दुसरीकडे, गौर गोरखपूर लायन्स किट संघाकडून कर्णधार ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३८ धावा केल्या. निशांत कुशवाहाने ३७ धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी चांगली सुरुवात केली, परंतु मोठ्या डावात रूपांतरित करू शकले नाहीत. शेवटी, शिवम शर्माने १४ चेंडूत २५ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. आकाश दीपने १६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २३ धावांची खेळी केली.
गोरखपूर लायन्सच्या संघाने निर्धारित २० षटकांत १६७ धावा केल्या.

आता आशिया चषक २०२५ च्या आधी, रिंकू सिंहने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे आणि आगामी स्पर्धेसाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्यासाठी मोठा दावेदारही असेल. रिंकू अखेरच्या षटकांमध्ये विस्फोटक फलंदाजी करत संघाच्या विजयात मोठे योगदान देऊ शकतो.