Rinku Singh, Priya Saroj: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह सध्या आशिया चषक आणि युपी टी -२० लीग स्पर्धेसाठी सराव करण्यात व्यस्त आहे. आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा रिंकू हा युपी टी -२० लीग स्पर्धेत मेरठ मार्विक्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू असताना त्याला मैदानावरच मोठं सरप्राइज मिळालं. जे पाहताच तो आश्चर्यचकित झाला.
रिंकू सिंह नोएडातील शहिद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी त्याची होणारी पत्नी खासदार प्रिया सरोज यांनी मैदानावर एन्ट्री केली. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा जून महिन्यात साखरपुडा झाला आहे. लवकरच दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. आपल्या होणाऱ्या पतीला समर्थन करण्यासाठी त्यांनी मैदानावर हजेरी लावली. ज्यावेळी रिंकूने पाहिलं की, प्रिया सरोज मैदानावर आल्या आहेत,त्यावेळी त्याची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खासदार प्रिया सरोज या आपल्या कामात खूप व्यस्त असतात. असं असतानाही त्यांनी वेळात वेळ काढला आणि मैदानावर हजेरी लावली.
रिंकू सिंह आशिया चषक खेळणार?
येत्या काही दिवसात आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. पण रिंकू सिंहला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी युपी टी-२० लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत जर रिंकूची बॅट तळपली. तर त्याचं भारतीय संघातील स्थान जवळजवळ निश्चित होईल.
रिंकू सिंह आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल स्पर्धेत यश दयालच्या एकाच षटकात सलग ५ षटकार मारून त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता.या दमदार कामगिरीनंतर तो तुफान चर्चेत आला होता. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची भारतीय संघात निवड झाली होती. रिंकू सिंहला आतापर्यंत ३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत त्याला ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि २ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १६१.०६ च्या सरासरीने ५४६ धावा केल्या आहेत. तर २ वनडे सामन्यांमध्ये त्याला ५५ धावा करता आल्या आहेत.