महिलांना पात्रता फेरीत सातवे स्थान

भारतीय धावपटूंना ऑलिम्पिकमधील मैदानी स्पर्धेत पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागले. पुरुषांच्या चार बाय ४०० मीटर रिले प्रकारात भारतीय संघ बाद करण्यात आला, तर महिलांना त्याच प्रकारात पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

बॅटन चुकीच्या पद्धतीने दिले गेले, या कारणास्तव महम्मद पुथानपुराक्कल, महम्मद अनास, अय्यास्वामी धारुन, राजीव आरोकिया यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला बाद करण्यात आले.

निर्मला शेरॉन, टिंटू लुका, एम.आर.पूवम्मा व अनिल्डा थॉमस यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाला पात्रता फेरीतील आठ संघांमध्ये सातवे स्थान मिळाले. त्यांनी हे अंतर ३ मिनिटे २९.३३ सेकंदांत पार केले. एकुणात त्यांना १६ संघांमध्ये १३वे स्थान मिळाले.

महिलांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सपना पुनियाने वेळेच्या मर्यादेत अंतिम रेषा पार न केल्यामुळे ‘शर्यत पूर्ण न करणारी खेळाडू’ असाच शेरा तिच्या नावापुढे नोंदवण्यात आला.

भारताच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या खुशबीर कौरने ही शर्यत एक तास ४० मिनिटे ३३ सेकंदांत पूर्ण केली आणि ६४ खेळाडूंमध्ये ५४वे स्थान घेतले. तिला एक तास ३३ मिनिटे ७ सेकंद या स्वत:च्या वैयक्तिक वेळेपेक्षा जास्त वेळ लागला.

भारताचे नित्येंद्रसिंग रावत, खेताराम व गोपी थोनाक्ला हे तीन खेळाडू मॅरेथॉन शर्यतीत भाग घेत आहेत. ही शर्यत रविवारी होणार आहे.