रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच कलात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया दीपा कर्माकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) दीपासाठी ‘फिजिओ’ पाठविण्याची जाग आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रिओला रवाना होण्याआधी दीपा कर्माकर हिने आपल्यासोबत एक पूर्णवेळ फिजिओथेरपिस्ट देखील पाठविण्यात यावा, अशी विनंती ‘साई’कडे केली होती. मात्र, क्रीडा प्राधिकरणाने दीपाने केलेली विनंती फेटाळून लावली होती. इतकेच नाही, तर पूर्णवेळ फिजिओची गरजच काय? असा उलट सवाल दीपाला केला गेला.

वाचा : अंतिम फेरीपर्यंत दीपा कर्माकर नजरकैदेत!

दीपाने आता अंतिम फेरी गाठल्यानंतर आता तिला हव्या त्या सुविधा देण्यासाठीचे प्रयत्न क्रीडा प्राधिकरणाकडून केले जात असल्याची माहिती दीपाच्या कुटुंबियांनी दिली. दीपाचे फिजिओथेरपिस्ट सजाद अहमद यांना त्वरित रिओला पाठविण्यात देखील आले आहे.

पात्रता फेरीत यश मिळविल्यानंतर क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी रिओमध्ये दीपाची भेट घेऊन तिला हव्या असलेल्या मदतीची विचारणा केली. तेव्हा दीपाने आपल्या प्रशिक्षकांना बोलाविण्यात यावे अशी मागणी केली आणि ती त्वरित मान्य देखील करण्यात आली.

वाचा : सलमान जेव्हा ‘दीपिका, दिप्ती की दीपा’ यामध्ये गोंधळून जातो!

दरम्यान, फिजिओसाठीची फक्त दीपाचीच नव्हे, तर इतर सर्वच खेळाडूंची मागणी प्राधिकरणाकडून फेटाळून लावण्यात आली होती. कर्माकर येत्या १४ ऑगस्ट रोजी अंतिम फेरीत खेळताना दिसणार असून, तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली दीपा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.