क्रीडा जगतात उल्लेखनीय कामगिरी करून देशाचा मान वाढविणाऱया माजी खेळाडूंवर आपल्या उतारवयात हलाकीचे जीवन जगण्याची नामुष्की ओढावत असल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली आहेत. असेच एक मनाला चटका लावून जाणारे उदाहरण पाकिस्तानात देखील आहे. एकेकाळी सायकलिंगचे चॅम्पियन ठरलेले पाकिस्तानचे सायकलपटू मुहम्मद आशिक यांच्यावर सध्या ऑटोरिक्षा चालवून गुजराण करण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे, मुहम्मद आशिक यांनी आपल्या करिअरची सुरूवात बॉक्सिंगच्या क्षेत्रातून केली होती. पण ५० च्या दशकात त्यांनी आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून बॉक्सिंगमध्ये होणाऱया दुखापतींमुळे खेळ बदलला. बॉक्सिंगसोडून त्यांनी आपले लक्ष सायकलिंगकडे केंद्रीत केले. बॉक्सिंगपाठोपाठ त्यांनी सायकलिंगमध्येही नाव कमवले. पाकिस्तानच्या ‘समर गेम्स’मध्ये १९६० आणि १९६४ साली त्यांनी सहभाग घेतला होता.

पाहा: रिओ ऑलिम्पिकचे वेळापत्रक

आता हाच ८१ वर्षांचा सायकलिंग हिरो सध्या लाहोरच्या गल्लीबोळात ऑटोरिक्षा चालवताना दिसतो. एकेकाळी पाकिस्तानच्या क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱया या खेळाडूला सध्या आपली दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुहम्मद आशिक म्हणतात की, मी एकेकाळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, अध्यक्ष, विशेष अधिकाऱयांशी हस्तांदोलन केले आहे. त्यांनी माझे भरभरून कौतुक देखील केले होते. हे सर्व ते कसे काय विसरू शकतात? यावर माझा विश्वासच बसत नाही. काहींना तर माझा मृत्यू झाला आहे, असे वाटते.
ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचे नेतृत्त्व करायला मिळणार हे जेव्हा मला समजले होते तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण माझी सध्याची परिस्थिती पाहता आता मी दररोज स्वर्गात जाण्याची वाट पाहत जगतो, अशी हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया मुहम्मद यांनी दिली.

VIDEO: रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्पर्धक सज्ज, शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळा