ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च मानाच्या क्रीडा स्पर्धेत पदक मिळविल्यानंतर खेळाडूंना त्यांच्या भावना व्यक्त करताना पाहणे, हादेखील एकप्रकारचा आनंदसोहळा असतो. अनेक खेळाडुंची मैदानात व्यक्त होण्याची पद्धत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चेचा विषय असतो. रिओमध्ये नुकत्याच झालेल्या महिला कुस्तीच्या स्पर्धेच्यावेळी असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. जपानची खेळाडू रिसाको कुवाई हिने कुस्तीमध्ये जपानला चौथे पदक मिळवून दिले. मात्र, त्यानंतर रिसाकोची आनंद व्यक्त करण्याची हटके पद्धत पाहून अनेकांना हसू आवरत नव्हते. रिसाकोने सुवर्णपदकाची लढत जिंकल्यानंतर तिचे अभिनंदन करायला आलेल्या प्रशिक्षकांना उचलून मॅटवर आपटले. रिसाकोने तब्बल दोनवेळा प्रशिक्षकांना मॅटवर आपटले.
रिसाकोची आनंद व्यक्त करण्याची ही पद्धत पाहून उपस्थित क्रीडाप्रेमींचे चांगलेच मनोरंजन झाले. रिसाकोने त्यानंतर प्रशिक्षकांना खांद्यावर बसवून रिंगणात फेरी मारली. गुरू शिष्येचा या अनोख्या स्नेहाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अंतिम फेरीच्या सामन्यापूर्वी माझ्या प्रशिक्षकांनी मला तुला खांद्यावर उचलून घ्यायचे आहे, असे म्हटले होते. आमच्या देशाच्या तीन कुस्तीपटूंनी आदल्यादिवशी सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे प्रशिक्षकांना माझ्याकडूनही अशाप्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, मला त्यांना मॅटवर आपटायचे होते, मी सामन्यापूर्वी त्यांना तसे बोलूनही दाखविल्याचे रिसाकोने सांगितले.