स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीपूर्वी अपेक्षेइतकी विश्रांती मला मिळाली नाही, तसेच गुडघ्याला दुखापतही झाली होती. त्यामुळेच मला पदकापासून वंचित राहावे लागले, असे महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू ललिता बाबरने सांगितले.

ललिताला रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेतील तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात दहावे स्थान मिळाले. राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे तिचे पुणे विमानतळावर थाटामाटात स्वागत करण्यात आले. कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख व क्रीडा खात्याचे आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल उपस्थित होते.

‘‘ऑलिम्पिकसाठी मी खूप मेहनत घेतली होती. तिथे प्राथमिक फेरीत मी ९ मिनिटे १९.७६ सेकंद अशी वेळ नोंदविली होती. खरे तर अंतिम फेरीत त्यापेक्षा कमी वेळ नोंदवत पदक मिळवण्याचे माझे ध्येय होते. परंतु प्राथमिक फेरीत घसरल्यामुळे मला गुडघ्यास दुखापत झाली होती. तसेच हातातही वेदना होत होत्या. त्याचा अनिष्ट परिणाम माझ्या अंतिम फेरीतील कामगिरीवर झाला. अंतिम फेरीतील अगोदरच्या रात्री १२.३० वाजता माझी उत्तेजक चाचणी घेण्यात आली. त्यामुळे मला अपेक्षेइतकी विश्रांती घेता आली नाही. त्याचा थोडासा परिणाम झाला,’’ असे ललिताने सांगितले.

‘‘रिओ ऑलिम्पिकमधील अनुभव मला भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त होणार आहे. आता  आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे माझे ध्येय आहे. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी मी आतापासूनच सराव व स्पर्धामधील सहभाग याचे योग्य नियोजन करीत आहे,’’ असेही ललिताने सांगितले.

देशमुख व माने यांनी ललिता हिच्या कामगिरीचे कौतुक करीत तिने पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न साकार करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

उत्तेजकामुळे अ‍ॅथलिटने रौप्यपदक गमावले

रिओ डी जानिरो : रशियाची गोळाफेकपटू येवगेनिया कोलोदोकोला २०१२ ऑलिम्पिकमध्ये मिळालेले रौप्यपदक गमवावे लागले. उत्तेजक चाचणीत ती दोषी आढळल्यामुळे तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २००८ व २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई सुरू केली आहे.