कोणत्याही गुरूखेरीज खेळाडूची कारकीर्द पूर्णत्वास जात नाही. भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये गुरू-शिष्यांची जोडी बराच काळ एकत्र टिकली आहे, असे सहसा दिसून येत नाही. अगदी प्रशिक्षक बदलले तरी खेळाडू व त्याचे प्रशिक्षक यांच्यात योग्य सुसंवाद नसेल तर खेळाडूला अपेक्षेइतके यश मिळत नाही.

कोणत्याही खेळाडूला कोणता प्रशिक्षक योग्य ठरेल, हे त्या-त्या खेळाडूने ठरवायचे असते. खेळाडू व प्रशिक्षक यांचा एकमेकांवर विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे असते. विशेषत: सांघिक खेळांमध्ये या सुसंवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी गुरू-शिष्यांची जोडी बरीच वर्षे एकत्र असायची. हल्लीच्या काळात क्रीडा क्षेत्रात व्यावसायिकता आल्यानंतर या दोन घटकांमध्ये अपेक्षेइतका सुसंवाद राहिलेला नाही. त्याचा परिणाम खेळाडूंच्या कारकीर्दीवर होऊ लागला आहे. भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची कारकीर्द पुल्लेला गोपीचंद यांनी घडवली. लंडन ऑलिम्पिकनंतर या दोघांमध्ये मतभेद वाढत गेले आणि त्याचा परिणाम सायनाच्या कामगिरीवर होऊ लागला. साहजिकच सायनाने प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला व तिने प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला प्रारंभ केला.

आपल्या देशात प्रांतिक वादाचे चटके खेळाडूंना सतत जाणवत असतात. विशेषत: उत्तर विरुद्ध दक्षिण भारत यांच्यातील कात्रीत महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणारे महाराष्ट्राचे मल्ल, बॉक्सिंगपटू, हॉकीपटू यांना अशा छळवणुकीस अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच मुंबईचा मल्ल नरसिंग यादव याच्याबाबत जे काही घडले ते याच प्रांतिक वादातून. नरसिंगचा गुन्हा काय? तर तो महाराष्ट्राचा मल्ल आहे. महाराष्ट्राच्या मल्लांना यापूर्वीही राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षकांकडून अपमानकारक वागणुकीचा त्रास सहन करावा लागला आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शिबिरातून माघार घ्यावी असे प्रयत्न राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून झाले आहेत.

महिला खेळाडूंना लैंगिक छळवणुकीचा अनुभव अनेक वेळा आला आहे, विशेषत: ज्या वेळी अंतिम संघ निवडणे बाकी असते अशा वेळी प्रशिक्षकांकडून शारीरिक सुखाची मागणी केली जाण्याचे प्रकार हॉकी व अन्य काही खेळांमध्ये घडले आहेत. कनिष्ठ संघातील खेळाडूंना असे अनुभव सर्रासपणे पाहायला मिळतात आणि दुर्दैवाने संघटक अशा प्रशिक्षकांच्या पाठीशी उभे राहतात, ही आणखी एक लाजिरवाणी गोष्ट असते. मध्यंतरी महिला वेटलिफ्टिंगपटूंकरिता परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. खेळाडूंकडून या प्रशिक्षकाने अवास्तव मागण्या केल्या व जेव्हा या खेळाडूंनी या मागण्या अमान्य केल्या. तेव्हा या प्रशिक्षकाने खेळाडूंच्या नकळत त्यांच्या आहारात उत्तेजक पदार्थ मिसळले. त्यामुळे दोन-तीन वेटलिफ्टिंगपटूंवर बंदीची कारवाईही झाली. भारतीय हॉकी संघाबाबत असे दिसून आले की, गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये १५हून अधिक प्रशिक्षक झाले आहेत. ज्याप्रमाणे खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये सुसंवादाची गरज असते, त्याप्रमाणेच हे प्रशिक्षक व संबंधित खेळाची राष्ट्रीय संघटना यांच्यातही समन्वयाची आवश्यकता असते. अनेक वेळा भारतीय संघाचे प्रशिक्षक व भारतीय हॉकी संघटक हे एकमेकांचे शत्रू असल्यासारखेच वागतात. त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होतो. १९८०नंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीत एकही पदक मिळवता आलेले नाही. यावरूनच आपल्या देशात हॉकीची काय अवस्था झाली आहे, हे स्पष्ट होते. खेळाडूं्च्या वैयक्तिक जीवनातील काही कटू प्रसंगांचा खेळातील कामगिरीशी जोड लावून या खेळाडूला हेतूपूर्वक संघातून डच्चू देण्याचे प्रसंग पुरुष व महिला हॉकीपटूंबाबत घडले आहेत. त्याचा परिणाम संघाच्या एकूण कामगिरीवर होतो, याचा विचार कोणताही प्रशिक्षक करीत नाही असेच आजपर्यंत दिसून आले आहे. खेळातील विविध डावपेचांची अंमलबजावणी करताना प्रशिक्षकाने खेळाडूला विश्वासात घेण्याची गरज आहे, तरच त्याचे डावपेच योग्य रीतीने यशस्वी होऊ शकतील. कोणत्याही खेळात जागतिक स्तरावर यश मिळवायचे असेल तर खेळाडू व प्रशिक्षक यांनी एकमेकांना पाण्यात न पाहता समन्वयाने वागले पाहिजे.

milind.dhamdhere@expressindia.com