रिओ ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक खेळाडूंना आज रोख बक्षीसमहिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार

रिओ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे गुरुवारी रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. बक्षीस जाहीर करून वर्ष लोटले तरी राज्याच्या क्रीडा विभागाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते आणि त्याला ‘लोकसत्ता’ने वारंवार वाचा फोडली होती. अखेर वर्षभरानंतर क्रीडा विभागाला या खेळाडूंना रोख पारितोषिक देण्याचा मुहूर्त सापडला.

गुरुवारी सह्य़ाद्री अतिथीगृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रिओ ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण २३ खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक व तिचे मार्गदर्शक कुलदीप सिंग, महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर व तिचे मार्गदर्शक भास्कर भोसले, धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू दत्तू भोकनळ, हॉकीपटू देविंदर वाल्मीकी, नेमबाज आयोनिका पॉल, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांचा उद्या सत्कार होणार आहे. तसेच पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडीपटू मरियप्पन थंगावेलू व मार्गदर्शन सत्यनारायण, भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया व मार्गदर्शक सुनील तंवर, गोळाफेकपटू दीपा मलिक व मार्गदर्शक वैभव सरोही, उंचउडीपटू वरुण भाटी, जलतरणपटू सुयश जाधव यांचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ उपविजेते ठरले. या संघामध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू असलेल्या मोना मेश्राम, पुनम राऊत, स्मृती मानधना, संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य, फिजोओ थेरेपिस्ट रश्मी पवार यांचाही सन्मान केला जाणार आहे.