Harbhajan Singh Reaction On India vs South Africa 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही गोलंदाजांची चांदी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. आश्चर्यचकीत करणारी बाब अशी की, ३ डाव संपूनही केवळ एकाच फलंदाजाला ५० धावांचा पल्ला गाठता आला आहे. तर सामन्याचा निकाल हा तिसऱ्या दिवशी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी बनवण्यात आलेल्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर हरभजन सिंगने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वाल देखील बाद होऊन माघारी परतला. पहिल्या दिवशी तब्बल ११ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय संघाचा संपूर्ण डाव १८९ धावांवर आटोपला.
सामन्यातील दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा फलंदाजीला यावं लागलं. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत दक्षिण आफ्रिकेचे ७ फलंदाज तंबूत परतले होते. म्हणजे दुसऱ्या दिवशी एकूण १६ विकेट्स गेल्या. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर हरभजन सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटचा सामना दुसऱ्याच दिवशी जवळपास संपुष्टात आला आहे, दुसरा दिवस अजून संपलेला नाही. कसोटी क्रिकेटची ही काय थट्टा आहे! #RIPTESTCRICKET”
कसोटी क्रिकेटचा खेळ ५ दिवसांचा असतो. पण ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी इतकी फायदेशीर आहे, की दोन्ही संघातील फलंदाज धावा करताना संघर्ष करताना दिसून येत आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल अडीच दिवसात लागू शकतो. पहिल्या डावात १५९ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १५३ धावांवर आटोपला आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १२४ धावांची गरज आहे.
