ग्रेटर नोइडा : ऋषभ पंत हा गुणी क्रिकटपटू आहे. परंतु त्याची महेंद्रसिंह धोनीशी तुलना होऊ शकत नाही, असे मत भारताचे विश्वचषक विजेते संघनायक कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पंत हा प्रथमपसंतीचा यष्टीरक्षक मानला जातो. परंतु भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी तो अजून धडपडत आहे. यासंदर्भात कपिल म्हणाला, ‘‘तुम्ही कुणाचीही तुलना धोनीशी करू नये. धोनीसारख्या खेळाडूची जागा घेणे कुणालाही शक्य नाही. धोनीशी तुलना करून पंतसारख्या नव्या खेळाडूवर दडपण आणणे अयोग्य ठरेल. पंतसुद्धा स्वत:चे नाव कमावेल.’’

भारतीय वेगवान गोलंदाजांच्या खेळाच्या ताणाबाबत कपिल म्हणाला, ‘‘खेळाचा ताण म्हणजे काय? मेहनत करणेच ना? मग तुम्ही मेहनतसुद्धा करणार नाही का?’’

कपिलच्या विश्वविजेत्या संघात मोहिंदर अमरनाथ, मदन लाल, रॉजर बिन्नी यांचा समावेश होता. आगामी विश्वचषक संघातील अष्टपैलू खेळाडूंविषयी कपिल म्हणाला, ‘‘विश्वचषक जिंकणे म्हणजे मिठाईवाल्याच्या दुकानातून मिठाई खरेदी करण्याइतपत सोपे नसते. संघातील खेळाडूंविषयी टीका करायला मला अजिबात आवडणार नाही. कच्च्या दुव्यांविषयी चर्चा करण्यापेक्षा बलस्थानांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.’’