रणजी चषक स्पर्धेत दिल्लीच्या रिषभ पंतने सर्वाधिक वेगवान शतक झळकाविण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १९ वर्षांच्या रिषभने झारखंडविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी करताना अवघ्या ४८ चेंडूंत शतक झळकावले. रिषभ पंत हा केवळ रणजी स्पर्धेतच नव्हे तर प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वीचा वेगवान शतकाचा विक्रम नमन ओझाच्या नावावर होता. नमन ओझाने जानेवारी २०१५मध्ये इंदूर येथील कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात ६९ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. रिषभ पंतने आजच्या खेळीने हा विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्या शतकी खेळीत १० षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.
रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने उपहारापर्यंत ४ बाद ३७४ धावांची मजल मारली. मिलिंद नाबाद १५ आणि रिषभ पंत ६६ चेंडूत नाबाद १३५ धावांवर खेळत होते. मात्र, उपहारानंतर तो लगेचच बाद झाला. यंदाच्या हंगामातील रिषभ पंतचे हे चौथे शतक आहे. यापूर्वी त्याने त्रिशतकही झळकावले होते. तत्पूर्वी झारखंडने पहिल्या डावात इशान किशनच्या २७३ धावांच्या जोरावर ४९३ धावा केल्या होत्या. रिषभ पंतने उन्मुक्त चंदच्या साथीने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली या लक्ष्याच्या जवळपास पोहचली आहे.