देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस
Rishabh Pant Injury Update IND vs ENG 4th Test: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली असून तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यष्टीरक्षक ऋषभ पंत दुखापतीमुळे रिटायर्ड होऊन मैदानाबाहेर गेला होता.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंत ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स शॉट खेळायला गेला, पण फटका चुकला आणि चेंडू थेट त्याच्या बुटावर लागला. त्यामुळे तो वेदनेने विव्हळताना दिसला. फिजिओने लगेच मैदानावर येऊन तपासणी केली आणि नंतर पंतला मैदानाबाहेर नेण्यात आलं. पायाला दुखापत झाल्यामुळे तो जागेवर उभाही राहू शकत नव्हता. त्यावेळी पंत ४८ चेंडूत ३७ धावांवर खेळत होता.
ऋषभ पंतला मैदानाबाहेर नेल्यानंतर त्याला रूग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे स्कॅन केल्यानंतर त्याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्याला ६ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेबाहेर जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अजूनपर्यंत पंतच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार यष्टीरक्षक ऋषभ पंतला पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे सहा आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूची कमतरता असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापनाने गरज भासल्यास ऋषभ पंत वेदनाशामक औषध घेऊन फलंदाजी करू शकतो का याची तपासणी करण्यास सांगितले आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की याची शक्यता नगण्य आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, “स्कॅन रिपोर्टमध्ये फ्रॅक्चर दिसून आलं आहे आणि तो सहा आठवड्यांसाठी मैदानाबाहेर झाला आहे. वेदनाशामक औषध घेतल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो का हे पाहण्याचा वैद्यकीय पथक प्रयत्न करत आहे. अजूनही, त्याला चालण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत, तो पुन्हा दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता खूपच कमी दिसते.”
ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर ‘या’ खेळाडूचं २ वर्षांनी संघात होणार पुनरागमन
दरम्यान, पंतच्या दुखापतीनंतर निवड समिती पाचव्या कसोटीपूर्वी इशान किशनचा संघात समावेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड ५ सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान ओव्हल येथे खेळला जाईल. इशान किशन जवळजवळ २ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
इशान सुमारे २० महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन करेल. इशान किशनने भारताकडून शेवटचा सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळला होता, जो टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. तर त्याने जुलै २०२३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.