‘‘इंग्लंड आणि रशिया यांच्यातील सामन्यानंतर प्रेक्षकांमध्ये झालेली हाणामारी, ही दु:खद घटना होती. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या काही मूर्ख लोकांमुळे फुटबॉल खेळाची प्रतिमा कलंकित होत आहे,’’ असे स्पष्ट मत इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू रॉबी फॉवलर यांनी व्यक्त केले.

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या युरो चषक स्पध्रेच्या निमित्ताने ‘सोनी’ वाहिनीतर्फे आयोजित ‘फुटबॉल एक्स्ट्रा’ या कार्यक्रमासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. युरो चषक स्पध्रेतील प्रत्येक सामन्याचे विश्लेषण या कार्यक्रमातून करण्यात येते.  त्यांच्यासह पोर्तुगालचे माजी फुटबॉलपटू डेको आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हेही कार्यक्रमात आपली मते मांडताना आपल्याला पाहायला मिळतील.

‘ब’ गटातील पहिल्याच सामन्यात इंग्लंड आणि रशिया या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये मैदानात आणि मैदानाबाहेरही चांगलीच जुंपली. फरक इतकाच, मैदानातील लढत ही खिलाडूवृत्तीची होती आणि मैदानाबाहेरील हिंसक. सामन्यानंतर झालेल्या हाणामारीत अनेक जण जखमी झाले, तर काहींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे जगातील सर्वात सुंदर खेळाला बट्टा बसला. पण या घटनेला इंग्लंडच्या चाहत्यांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे फॉवलर म्हणाले. ‘‘त्या घटनेसाठी इंग्लंडच्या चाहत्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. काही मूर्ख लोकांमुळे या अशा घटना घडतात. इंग्लंडचे बरेचसे चाहते हे सामन्याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित असतात,’’ असे फॉवलर यांनी सांगितले.

याच वेळी युरो स्पध्रेतील संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना फॉवलर म्हणाले की, ‘‘इंग्लंडचा संघ सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयशी ठरत आहे. आपला संघ जिंकावा असे मला वाटत असले तरी यंदा इटली युरो चषक पटकावेल. उत्तर आर्यलड, हंगेरी यांनी आत्तापर्यंत प्रभावित केले आहे. स्पेनमध्ये भरपूर गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडे चांगल्या आक्रमणपटूची कमी आहे.’’