मिल्मॅनवर संघर्षपूर्ण विजय; सेरेना, गतविजेत्या ओसाकाचे आव्हान संपुष्टात

मेलबर्न : गतवर्षी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयांचे शतक नोंदवणाऱ्या तिसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतही विजयांचा शतकमहोत्सव साजरा केला. मात्र यासाठी तिसऱ्या फेरीत फेडररला ऑॅस्ट्रेलियाच्या जॉन मिल्मॅनशी साडेचार तासांची पाच सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. महिलांमध्ये २३ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आले, तर सेरेनाकडून मार्गदर्शनाचे धडे घेतलेली अमेरिकेचीच अवघी १५ वर्षीय कोको गॉफने गतविजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियातील वेळेप्रमाणे मध्यरात्रीचे १२ वाजून ५० मिनिटे झाली असताना फेडररने ४-६, ७-६, ६-४, ४-६, ७-६ असा टायब्रेकरवरील लढतीत विजय नोंदवला. विशेष म्हणजे अखेरच्या क्षणी फेडरर ५-८ असा पिछाडीवर होता. मात्र त्यातून त्याने १०-८ अशी बाजी मारली. याचप्रमाणे सहावा मानांकित ग्रीसचा त्सित्सिपासवर राओनिकने ७-५, ६-४, ७-६ असा विजय मिळवला.

महिलांमध्ये यंदाच्या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आणि बिगरमानांकित गॉॅफने गतविजेती ओसाकाला पराभूत केले. याबरोबरच गॉफने पाच महिन्यांपूर्वी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ओसाकाकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. गॉफने ६-३, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये ओसाकाचा पराभव केला. दोन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकणारी तिसरी मानांकित ओसाकाने असंख्य चुका केल्या. परिणामी पहिला सेट गॉफने ३२ मिनिटांतच जिंकला. पहिल्या सेट जिंकल्यानंतर तिचा आत्मविश्वास उंचावला. दुसऱ्या सेटमध्ये १-१ बरोबरीतून गॉफने ५-४ आघाडी घेतली. तेव्हा सव्‍‌र्हिस तिच्याकडेच होती आणि ती संधी तिने जिंकण्यासाठी घेतली.

सेरेनाचा चीनच्या वॅँग किआंगकडून तीन सेटमधील चुरशीच्या लढतीत ४-६, ७-६, ५-७ असा पराभव झाला. दुसरा सेट जिंकून सेरेनाने आव्हान टिकवले होते. मात्र पुन्हा तिसऱ्या सेटमध्ये सेरेनाचा निभाव लागला नाही. ३८ वर्षीय सेरेना ‘आई’ झाल्यानंतर गेल्या आठ ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धामध्ये जेतेपद पटकावू शकलेली नाही. मार्गारेट कोर्टच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाने तिला पुन्हा हुलकावणी दिली.

अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने चौथ्या फेरीत सहज प्रवेश केला. तिने २९व्या मानांकित एलिना रायबॅकिनाचा ६-३, ६-२ पराभव केला. १९७८ नंतर महिला एकेरीची ऑस्ट्रेलियन विजेती होण्यासाठी बार्टी प्रयत्नशील आहे.

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात मी कनिष्ठ गटात खेळत होते आणि आता विश्वास ठेवणे कठीण आहे. खेळताना कोणत्या क्षणाला काय होईल, हे माहिती नसते. त्यामुळे सतत झुंज द्यायचीच जिद्द बाळगली होती. – कोको गॉफ

..गॉफ तेव्हा रडली होती! :

अवघी १५ वर्षीय गॉफ आजही टेनिस जगताला आठवतेय ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी. कारण त्यावेळेस गॉफचा अवघ्या एका तासात ओसाकाकडून पराभव झाला होता. ३-६, ०-६ असा पराभव त्यावेळेस गॉफला स्वीकारावा लागला होता. मात्र पराभवानंतर गॉफ ढसाढसा रडली होती. त्यावेळी ओसाकाही भावूक झाली आणि विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी गॉफकडे जाऊन तिची समजूत काढली. गॉफने शुक्रवारी त्याच ओसाकाला पराभूत करण्याची किमया साधली.

स्पर्धा विक्रमाशी बरोबरी करण्याचा आत्मविश्वास मला अजूनही आहे. – सेरेना विल्यम्स

चिलिचचा अगुटला धक्का!

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील माजी उपविजेता मॅरिन चिलिचने नवव्या मानांकित स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा अगुटला पाच सेटमध्ये धक्का दिला. ३१ वर्षीय क्रोएशियाच्या बिगरमानांकित चिलिचने अगुटला ६-७, ६-४, ६-०, ५-७, ६-३ नमवले. चिलिचची आता चौथ्या फेरीत ३२वा मानांकित कॅनडाच्या मिलॉस राओनिकशी लढत होईल. गेल्या वर्षी चिलिचची सातव्या क्रमवारीवरून ३९व्या क्रमवारीवर घसरण झाली होती.

वोझ्नियाकीची निवृत्ती

डेन्मार्कची कॅरोलिन वोझ्नियाकीचा चौथ्या फेरीत टय़ुनिशियाच्या ओन्स जॅबेयूरकडून पराभव झाला. याबरोबरच वोझ्नियाकी टेनिसमधून निवृत्त झाली. वोझ्नियाकी आणि सेरेना या एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी म्हणून ओळखल्या जातात. वोझ्नियाकीच्या पराभवानंतर काहीच क्षणात सेरेनाचाही पराभव झालेला टेनिसजगताने पाहिला.

किर्गियोसची पुन्हा नदालवर टीका

राफेल नदाल आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गियोस यांच्यातील वाद नेहमीच जाहीरपणे समोर येतो. पुन्हा किर्गियोसने वादाला तोंड फोडले आहे. नदाल सव्‍‌र्हिस करताना नेहमी वेळ काढत असतो याकडे किर्गियोसने लक्ष वेधले. इतकेच नाही तर दुसऱ्या फेरीतील लढतीत गाईल्स सिमॉन आणि किर्गियोस यांनी एकमेकांविरुद्ध खेळताना नदालच्याच सव्‍‌र्हिस करण्याआधी करत असलेल्या काही कृतींची नक्कल केली. नदालला सव्‍‌र्हिस करण्यापूर्वी सतत केसांशी खेळण्याची सवय आहे, याकडे किर्गियोस लक्ष वेधतो. अर्थातच पंचांना दुसऱ्या फेरीतील लढतीत किर्गियोस आणि सिमॉन यांना ताकीद द्यावी लागली होती.

’ वेळ : पहाटे ५:३० पासून   ’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स