रॉजर फेडरर सातत्य राखण्यासाठी उत्सुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी किती वर्षे खेळेन, याची कल्पना नसल्याचे टेनिसपटू रॉजर फेडररने म्हटले आहे, मात्र त्याच वेळी वाढत्या वयाचा नाही, तर खेळाचा विचार असल्याचे त्याने स्पष्ट केले. स्वित्र्झलडच्या ३६ वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकून टेनिसविश्वातील दबदबा राखला. त्याचे वर्षभरातील हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. मेलबर्न पार्कवरील विजयानंतर पुढील वाटचालीबाबत विचारले असताना फेडररने त्याची भूमिका स्पष्ट केली.

‘‘मागील १२ महिन्यांमध्ये मी तीन जेतेपदे मिळवली. इतका चांगला खेळ करू शकतो. तसेच पूर्णपणे तंदुरुस्ती राखू शकतो, याबाबत स्वत:वर विश्वास बसत नाही. मात्र रोजच्या वेळापत्रकाचे अनुकरण केले. सवरेत्कृष्ट कामगिरीची इच्छा आणि मानसिकता असेल तर चांगल्या गोष्टी घडू शकतात,’’ असे फेडरर म्हणाला. मी आणखी किती वर्षे खेळणार, हे वयावर अवलंबून नसेल, असेही फेडररने सांगितले. तो म्हणाला, ‘‘वाढते वय चिंतेची बाब ठरू शकत नाही. दर वर्षी तुम्ही एका वर्षांने मोठे होता. मात्र वाढत्या वयामध्ये भविष्यातील स्पर्धाबाबत नियोजन करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. माझे पुढील ध्येय काय असेल तसेच अधिक प्राधान्य कशाला द्यायचे, हेही ठरवावे लागेल.’’

‘‘आताच्या नियोजनावरच माझे पुढील यशापयश अवलंबून राहील; परंतु भविष्यातही चांगले यश मिळेल, असा विश्वास वाटतो. एक व्यावसायिक टेनिसपटू म्हणून माझा खेळ, कारकीर्द आणि टेनिसविश्वातील स्थानाबाबत समाधानी आहे,’’ असे फेडररने म्हटले.

यंदाचे ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील जेतेपद हे फेडररसाठी विक्रमी ठरले आहे. मेलबर्न पार्कवर सहाव्यांदा चषक उंचावतानाच त्याने महान टेनिसपटू ऑस्ट्रेलियाचे रॉय इमर्सन आणि सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. फेडरर हा कारकीर्दीत २० किंवा त्याहून अधिक ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारा जगातील चौथा टेनिसपटू तसेच पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

फेडरर हा १९७२ नंतर ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा राफेल नदाल आणि जोकोविचसह स्वित्र्झलडचा स्टॅनिस्लास वाविरका आणि ब्रिटनचा अँडी मरे हे अव्वल खेळाडू दुखापतीने त्रस्त असताना चाळिशीतल्या फेडररने अंतिम फेरीत त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान टेनिसपटूला पाच सेटमध्ये झुंजवले. यावरून फेडररच्या अफाट तंदुरुस्तीची कल्पना येते. सवरेत्कृष्ट खेळासह तंदुरुस्तीचे गमक सांगताना फेडरर म्हणतो, ‘‘अति खेळणे टाळायला हवे. प्रत्येक स्पर्धा खेळणे शक्य नसते. मी सरावावर अधिक भर देतो. माझ्या यशात प्रशिक्षक, फिजिओ आणि सपोर्ट स्टाफचाही मोठा वाटा आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer say no idea how long he will play
First published on: 30-01-2018 at 01:50 IST