‘आधुनिक टेनिसचे शिलेदार’ असणारे रॉजर फेडरर व राफेल नदाल ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

१७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेला फेडरर पाच वर्षांनंतर जेतेपद पटकावण्यासाठी आतूर आहे, तर राफेल नदाल १५वे ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर करण्यासाठी उत्सुक आहे. याआधी या दोघांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेत असंख्य मॅरेथॉन लढती झाल्या आहेत. तशाच अनुभवाची प्रचिती घेण्यासाठी जगभरातील चाहते सज्ज झाले आहेत.

गेल्या वर्षभरात गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे फेडररला निम्मे वर्ष खेळताच आले नाही. दुसरीकडे मनगटाच्या दुखापतीने सतावल्यामुळे नदाल प्रदीर्घ काळ कोर्टपासून दुरावला. मात्र विलक्षण इच्छाशक्तीच्या जोरावर या दोघांनी पुनरागमन केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेला अव्वल मानांकित अँडी मरे आणि नोव्हाक जोकोव्हिच यांचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे फेडरर -नदाल यांच्यात महामुकाबला होण्याची शक्यता निर्माण झाली. दुखापतीमुळे हालचालींवर आलेल्या मर्यादा, युवा खेळाडूंची ऊर्जा यांना पुरेपूर टक्कर देत फेडरर आणि नदाल यांनी अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत फेडररने मिश्ता झरेव्हचे तर नदालने ग्रिगोर दिमोत्रव्हचे आव्हान संपुष्टात आणले.

या दोघांमधील एकूण लढतीत नदाल २३-११ असा आघाडीवर आहे. हार्ड कोर्टवरच्या लढतीतही नदालकडे ९-७ अशी आघाडी आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत नदालचे ३-० असे वर्चस्व राहिले आहे. यंदा स्पर्धेत नदालने १८ तास आणि ५५ मिनिटे कोर्टवर व्यतीत केली आहेत तर फेडररला १३ तास ३७ मिनिटेच खर्च करावी लागली आहेत.