Rohit Sharma Arrive Oval to Watch IND vs ENG Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारतीय संघ सध्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. यादरम्यान नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपने अर्धशतक झळकावलं आहे, तर यशस्वी शतकाच्या जवळ आहे. पण आता हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा ओव्हलच्या मैदानात पोहोचला आहे.

भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा सामना पाहण्यासाठी ओव्हलमध्ये पोहोचला. स्टेडियममध्ये प्रवेश करताना तो गेटवर कॅमेऱ्यात कैद झाला. हिटमॅन स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापूर्वी रांगेत उभा राहून आणि तिकीट तसेच ओळखपत्र दाखवून प्रवेश करताना दिसला, याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

युवा भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा

रोहित सामान्य माणसासारखा स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसला. यादरम्यान तो रांगेत उभा राहून त्याने तिकिट तपासली आणि मग तो पुढे गेला. रोहित शर्माचा व्हीडिओदेखील काढण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने व्हीडिओ काढू नका असंही सांगताना दिसला. युवा भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी रोहित शर्मा स्टेडियममध्ये पोहोचला आहे. त्याचे फोटो, व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

सध्या रोहित त्याची पत्नी रितिका आणि कुटुंबासह युरोप दौऱ्यावर आहे. तो इन्स्टाग्रामवर त्यांच्या सुट्ट्यांमधील खास क्षणांचे फोटो शेअर करत आहे. यादरम्यान हिटमॅन भारत आणि इंग्लंडमधील ओव्हल कसोटी पाहण्यासाठी पोहोचला आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयपीएल २०२५ दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

रोहितने एका इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये खेळताना मात्र दिसणार आहे. रोहितने गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. हिटमॅन आता २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये खेळण्याची शक्यता आहे.

रोहितने २०२१ मधील इंग्लंड दौऱ्यावर ओव्हलच्या मैदानावर शतक केलं होतं. रोहितच्या उपस्थितीमुळे पुन्हा या शतकाची चर्चा सुरू आहे. रोहितने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा केल्या.