रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पार पडलेल्या सामन्यात, प्रदूषणामुळे हवेची खालावलेली पातळी हा चर्चेचा मुद्दा ठरला होता. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सामन्याचं स्थळ बदलण्यास नकार दिल्यामुळे, दिल्लीतच सामना पार पडला.

७ नोव्हेंबरला राजकोटच्या मैदानावर भारत दुसरा टी-२० सामना खेळणार आहे. त्याआधी रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी दिल्लीतल्या प्रदूषणाबद्दल रोहितला प्रश्न विचारला असता, रोहितने आपल्या मजेशीर स्वभावाप्रमाणे, मिर्च-मसाला चाहिए, लेकिन दूँगा नही ! उत्तर देत पत्रकारांचीच फिरकी घेतली.

दरम्यान दुसऱ्या सामन्यावर देखील संकटाचे काळे ढग तयार झाले आहेत. याच कालावधीत अरबी समुद्रात ‘महा’नावाचं चक्रीवादळ येणार असल्यामुळे ६-७ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिव-दमण, वेरावल परिसरात या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असल्यामुळे या काळात गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

अवश्य वाचा – Ind vs Ban : सामना गमावूनही रोहित शर्मा ठरला अव्वल