ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याला दुखापतीमुळे कसोटी मालिकेकून माघार घ्यावी लागली. दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर त्याच्या दुखापतीची गांभीर्य पाहता उमेशने उर्वरित मालिकेतून माघार घेतली. त्याच्या जागी IPLमध्ये हैदराबादच्या संघाकडून खेळलेला टी नटराजन याला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच, उर्वरित मालिकेसाठी रोहित शर्माला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आठवं षटक टाकत असताना उमेशच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्या डाव्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे स्कॅननंतर निष्पन्न झाले. कसोटी मालिका संपेपर्यंत तो दुखापतीतून तंदुरूस्त होणं शक्य नसल्याचं फिजीओंनी सांगितल्यानंतर त्याने मालिकेतून माघारी घेतली व तो मायदेशी परतला. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून टी नटराजन याला संघात स्थान देण्यात आलं. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली.

दरम्यान, अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याची अंतिम ११च्या संघात निवड पक्की झाली आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या चमूत रोहितला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातील त्याचा समावेश निश्चित आहे. परंतु रोहितला खेळवण्यासाठी मयंक अगरवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. तसेच, रोहित नेमका कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? याबाबतही संघ व्यवस्थापनाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.