How Rohit Sharma Proposed Ritika Sajdeh: भारतीय स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर रोहित सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. रोहित त्याची पत्नी रितिका सजदेहसह हरभजन सिंग आणि गीता बसराच्या ‘व्हू इज द बॉस’ या शोमध्ये आला होता. यादरम्यान त्याने पत्नी रितिकाला कसं प्रपोज केलं आणि त्यांची लव्हस्टोरी कशी होती हे सांगितलं.
हिटमॅनची लव्हस्टोरी एकदम फिल्मी आहे. त्याने रितिका सजदेहला आईस्क्रिम खाण्यासाठी जाऊया असं सांगितलं आणि मग तिला स्टेडियममध्ये नेत प्रपोज केलं होतं. रोहितने सांगितले की त्याने रितिकाला प्रपोज करण्यासाठी सुरूवातीला तिच्याशी खोट बोलत प्लॅनिंग केलं होतं. त्याने तिला आईस्क्रीम खायला नेण्याचं निमित्त केलं.
यादरम्यान, रितिका त्याला आईस्क्रीम कुठे आहे हे विचारत राहिली. त्यादरम्यान, रोहितने तिला सांगितलं की तो तिला बोरिवलीतील एका ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तो पूर्वी राहत होता. त्यानंतर रोहितने स्टेडियममधील मैदानावर गुडघ्यावर बसून रितिकाला प्रपोज केलं आणि रितिकानेही त्याचं प्रपोजल स्वीकारला.
रोहित शर्मा म्हणाला, “माझं प्रपोजल खूपच रोमँटिक होतं. मी १२ वर्षांचा असताना जिथे क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती, तिथे घेऊन गेलो. रितिका घरून जेवण घेऊन आली होती, आम्ही ते जेवलो आणि तिला म्हणालो चल आईस्क्रिम खायला जाऊ, मला कंटाळा आलाय. मग आम्ही कारने निघालो. आम्ही मरीन ड्राईव्हच्या इथून गेलो.”
“आम्ही हाजी अली, वरळी, दादर, वांद्रे ओलांडलं. ती मला सारखं विचारत होती की आईस्क्रीम कुठे आहे, तू मला कुठे घेऊन जातो आहेस. मी तिला सांगितलं की बोरिवलीमध्ये मी जिथे राहायचो तिथे एक चांगली जागा आहे. तू कधीच नाही गेली आहेस तिथे, चल मी तुला घेऊन जातो. तिने विचारलं की आईस्क्रिम खाण्यासाठी इतकं लांब का जायचंय”, रोहित पुढे सांगताना म्हणाला.
रोहितने रितिकाला कसं प्रपोज केलं हे सांगताना म्हणाला, “त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो, तिथे एक मैदान होतं. पूर्ण अंधार असल्यामुळे ते मैदान आहे याचा तिला अंदाज आला नाही. मी माझ्या मित्राला आधीच तिथे तयारी करून ठेवायला सांगितलं होतं आणि व्हीडिओ काढण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही कार पार्क केली. त्यानंतर मी मैदानाच्या बरोबर मध्ये जाऊन गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं होतं.”
रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सामन्यात तो खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या विजयानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर इंग्लंडविरूद्ध मालिकेपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.