Rohit Sharma Viral Video: भारताच्या वनडे संघाच्या कर्णधार रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला रोहित मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने लंडनमध्ये भारत- इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यानंतर तो मुंबईतील रस्त्यावर आपली नवी कोरी लॅम्बॉर्गिनी कार चालवताना दिसून आला होता. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे, ज्यात तो एका फॅनला ऑटोग्राफ देताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित शर्मा आपली नवीकोरी लॅम्बॉर्गिनी घेऊन बाहेर फेरफटका मारण्यासाठी जाताना दिसून येत आहे. त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यादरम्यान रोहितची नजर एक फॅनवर पडली. या फॅनने आपल्या हाताने रोहितचे सुंदर चित्र रेखाटले होते. ही फॅन रोहितला हे चित्र भेट म्हणून देण्यासाठी आली होती. दरम्यान रोहितने तिला पाहिलं, कार थांबवली आणि तिला भेटण्यासाठी बोलवलं. भेटल्यानंतर रोहितने या चित्रावर ऑटोग्राफ दिला आणि एक सुंदर मेसेजही लिहीला. आपल्या आवडत्या खेळाडूने स्वत: बोलवून ऑटोग्राफ देणं, याहून सुंदर आणखी काय असू शकतं. त्यानंतर रोहितने हे सुंदर चित्र हातात घेऊन फॅन आणि कुटुंबासह फोटो देखील काढला.
रोहित शर्मा आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर एकही सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. रोहितने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला चॅम्पियन बनवलं होतं. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. मात्र, या सामन्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्याआधी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.
रोहित वनडे क्रिकेटलाही रामराम करणार?
टी-२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर आता रोहित वनडे क्रिकेटलाही रामराम करू शकतो, अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत रोहित भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो. पण वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेला अजून बराच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे रोहित शर्मा २०२७ पर्यंत संघात टिकून राहणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे.