Rohit Sharma Viral Video: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल झाल्यानंतर तो एकही सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्या क्रिकेटच्या मैदानावरील पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान रोहित आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईकर रोहित आपली नवीकोरी लॅम्बॉर्गिनी उरूस एसई कार चालवताना दिसून आला आहे. या कारची किंमत ४.५७ कोटी रूपये इतकी आहे. दरम्यान रोहितचा कार चालवत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या रोहित शर्मा क्रिकेटमधून मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. गेले काही दिवस तो लंडनमध्ये होता. यादरम्यान त्याने भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. आता तो मुंबईत आपली कार चालवताना दिसून आला आहे. दरम्यान कार चालवत असताना तो मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकला. वाहतूक कोंडीमुळे वाहनांची रांगच रांग लागली होती. त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या रोहितला देखील आपली कार थांबवावी लागली. त्यावेळी रोहितची नजर व्हिडीओ शूट करत असलेल्या चाहत्याकडे गेली. त्यावेळी रोहितने त्याला थम्पअप दाखवला. रोहितची रिअॅक्शन पाहून चाहत्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला.

रोहित शर्मा मैदानावर केव्हा परतणार?

क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला रोहित शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अलीकडेच त्याने अभिषेक नायरसोबत ट्रेनिंग करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावरून हे स्पष्ट झालं होतं की, रोहित शर्मा देखील मैदानावर पुनरागम करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. रोहितने कसोटी आणि टी-२० क्रिकेटला रामराम केलं आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.

रोहित आणि विराट २०२७ चा वर्ल्डकप झाल्यानंतर निवृत्तीची घोषण करणार अशी चर्चा सुरू आहे. त्याआधी तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून पुनरागमन करू शकतो. रोहित या मालिकेआधीच वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, अशी देखील चर्चा सुरू होती. पण बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.