Rishabh Pant Shared Rohit Sharma Unseen Video: भारताचा वनडेमधील कर्णधार रोहित शर्मा टी-२० आणि कसोटी क्रिकेटनंतर वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा सुरू आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अखेरचा भारतासाठी खेळताना दिसला होता. यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर सेलिब्रेशन करताना मैदानावरील रोहित शर्माचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
ऋषभ पंतने भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतरचा एक कमालीचा व्हीडिओ शेअर केला आहे. भारताने जेतेपद पटकावताच ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर कसं वातावरण होतं, याचा ऋषभ पंतने एक व्हीडिओ काढला होता. तो त्याने भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शेअर केला आहे. चाहत्यांनी पंतच्या या BTS व्हीडिओवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
ऋषभ पंतने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये भारताच्या विजयानंतर खेळाडू जल्लोष करताना, आनंद साजरा करताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. ड्रेसिंग रूममध्ये पंत, रोहित आणि गिल भारताच्या विजयानंतर प्रथम जल्लोष करताना दिसले. यानंतर कुलदीप यादव आणि गिलबरोबर मस्ती केल्यानंतर संपूर्ण संघ घोळक्यात मस्ती करताना दिसत आहेत.
काय, निवृत्ती घेऊ? रोहित शर्माचा कधीही न पाहिलेला VIDEO व्हायरल
थोड्यावेळाने ऋषभ पंत स्टंप घेऊन जात असलेल्या रोहित शर्माला विचारतो, “रोहित भाई स्टंप घेऊन कुठे जाताय?” यानंतर रोहित ऋषभ पंतच्या जवळ येऊन त्याला विचारतो, “काय, निवृत्ती घेऊ? प्रत्येक वेळी आपण जिंकलो की मी काय प्रत्येक वेळेला रिटायरमेंट थोडी घेऊ?” यानंतर पंत हसायला लागतो. पंत रोहितबरोबर तिथे थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघुदेखील असतो. रघुकडे हात दाखवत पंत म्हणतो, तो हसतोय. यानंतर पंत पुढे म्हणतोय, “मी असं काही म्हटलं नाही, उलट माझं तर म्हणणं आहे की तुम्ही खेळत राहावं.”
हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. खरंतर, रोहितने असं म्हणण्यामागे एक कारण होतं. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी असं म्हटले जात होतं की तो अंतिम सामन्यानंतर रोहित या फॉरमॅटमधूनही निवृत्त होईल. रोहित शर्माने याआधी टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावल्यानंतर त्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
रोहित शर्माने टी-२० क्रिकेटनंतर अचानक कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे रोहित शर्मा आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माने विश्रांतीनंतर आता पुन्हा सरावाला सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे. रोहितने काही दिवसांपूर्वी अभिषेक नायरबरोबर जिममधील फोटो शेअर केला होता. रोहित आणि अभिषेक नायर खूप चांगले मित्र आहेत आणि अनेकदा रोहित अभिषेक नायरबरोबर सराव करताना दिसला आहे.