मर्सिडीझ संघाच्या निको रोसबर्गने पोल पोझिशनचा सुरेख उपयोग करून घेत जर्मन ग्रां.प्रि. जेतेपदावर कब्जा केला. जर्मनीच्या रोसबर्गने मायदेशात मिळवलेले पहिले जेतेपद आहे. या जेतेपदासह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये रोसबर्गने संघसहकारी लुईस हॅमिल्टनला मागे टाकत १४ गुणांची आघाडी घेतली आहे. विल्यम्स संघाच्या वाल्टेरी बोल्टासने दुसरे तर लुईस हॅमिल्टने तिसरे स्थान पटकावले. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने हॅमिल्टनला सराव सत्र पूर्ण करता आले नव्हते. रोसबर्गला प्रोत्साहन देण्यासाठी मर्सिडीझच्या पिटमध्ये विश्वचषक विजेत्या जर्मनीच्या संघातील ल्युकास पोडोलस्की उपस्थित होता. ‘जर्मनीत जेतेपद पटकावणे सुखावह आहे. हा माझ्यासाठी खास दिवस आहे’, या शब्दांत रोसबर्गने आपल्या भावना व्यक्त केल्या. सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गने सातवे तर सर्जिओ पेरेझने दहावे स्थान पटकावले.