एकमेव ट्वेन्टी-२० सामना, एकदिवसीय मालिका आणि पहिली कसोटी यानंतरही विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सावध सुरुवात केली. कर्णधार रॉस टेलरची शतकी खेळी न्यूझीलंडच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. नाणेफेक जिंकून टेलरने फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र मार्टिन गप्तील आणि धडाकेबाज फलंदाज ब्रेंडान मॅक्क्युलम दोघेही झटपट तंबूत परतल्याने न्यूझीलंडची २ बाद १४ अशी अवस्था झाली. मात्र यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी २०९ धावांची नाबाद भागीदारी करत डाव सावरला. १० चौकारांच्या साह्य़ाने टेलरने शतकी खेळी साकारली. पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने २ बाद २२३ धावा केल्या आहेत. टेलर ११९ तर विल्यमसन ९५ धावांवर खेळत आहे.