ठाणे येथील पारपत्र कार्यालयाने अखेर नाशिकचा युवा धावपटू किसन तडवीच्या मार्गातील अडथळा दूर केल्याने युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बँकॉक येथे २१ व २२ मे रोजी होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेत त्याचे खेळणे निश्चित झाले आहे. शनिवारी किसनला पारपत्र मिळेल, अशी ग्वाही कार्यालयीन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पात्रता फेरीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात महाराष्ट्रातील केवळ दोनच खेळाडूंचा समावेश असून किसन हा त्यातील एक आहे. भारतीय संघात निवड झाल्याने आनंदी झालेला किसन पारपत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे पुरता निराश झाला होता. किसनचे ज्येष्ठ बंधू फुलसिंग तडवी यांनी पारपत्रासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही शर्मा नामक मुख्य अधिकारी रजेवर असल्याने पारपत्र देता येत नसल्याचा आडमुठेपणा ठाणे येथील कार्यालयाने दाखविला होता. वस्तुत: ३० एप्रिल रोजी कागदपत्रे सादर केल्यानंतर दोन दिवसांत पारपत्र मिळून जाईल, असे आश्वासन किसनचे बंधू फुलसिंग तडवी यांना अधिकाऱ्यांनी दिले होते. तसे न झाल्याने फुलसिंग यांनी बुधवारी ठाणे कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना गुरुवारी कार्यालयात येण्याविषयी सांगण्यात आले. त्यानुसार गुरुवारी फुलसिंग हे किसनला घेऊन ठाणे येथील पारपत्र कार्यालयात उपस्थित झाले. नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी विजयकुमार या अधिकाऱ्यास दूरध्वनीवरून पारपत्र त्वरित मिळणे किती आवश्यक आहे, हे पटवून दिले. अखेर विजयकुमार यांनी शनिवापर्यंत किसनच्या पत्त्यावर पारपत्र मिळून जाईल अशी ग्वाही दिली. तत्पूर्वी, इतर कामांसाठी आवश्यक असल्याने पारपत्र क्रमांकही त्यांनी दिला. त्यामुळे किसन आता भारतीय संघासमवेत बँकाँकला जाऊ शकणार आहे. भारतीय संघ १९ मे रोजी दिल्ली येथून रवाना होणार आहे.