SA beat AUS by 84 Runs In 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाचा घरच्या मैदानावर पराभूत करत वनडे मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेविरूद्ध सलग दुसरा वनडे सामना गमावला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने जिंकत आफ्रिकेने मालिका आपल्या नावे केली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करत तब्बल ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकांत २७७ धावांवर सर्वबाद झाला होता. आफ्रिकेकडून मॅथ्यू ब्रिट्झकेने ८८ धावांची मोठी खेळी करत वर्ल्ड रेकॉर्डही केला होता. तर ट्रिस्टन स्टब्सने ७४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून बार्टलेट, नॅथन एलिस आणि लबुशेन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या, तर एडम झाम्पाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

लुंगी एनगिडीने ५ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला नमवलं

आफ्रिकेने दिलेल्या २७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३७.४ षटकांत १९३ धावांवर सर्वबाद झाला. कॅमेरून ग्रीन ३५ धावांची खेळी केली. तर जोश इंग्लिस ७४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८७ धावांची मोठी खेळी केली. पण लुंगी एनगिडी ऑस्ट्रेलियावर चांगलाच भारी पडला. एनगिडीने ५ विकेट्स घेत संघाच्या फलंदाजीला सुरूंग लावला आणि आफ्रिकेच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने ८.४ षटकांत ४२ धावा देत विकेट्स घेतल्या. याशिवाय नांद्रे बर्गर, मुथ्थुस्वामी यांनी प्रत्येकी २ तर वियान मुल्डरने १ विकेट घेतली.

कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या महान खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला एका रोमांचक टी-२० मालिकेत २-१ ने हरवले होते, परंतु एकदिवसीय मालिकेतील आव्हान अधिक कठीण होतं. आफ्रिकेने टी-२० मालिकेचा बदला घेत वनडे मालिका आपल्या नावे केली.

प्रथम, कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार्क सारख्या अनुभवी गोलंदाजांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली. दुसरं म्हणजे, स्टीव्ह स्मिथ आणि मॅक्सवेल सारख्या स्टार फलंदाजांनी काही महिन्यांपूर्वी या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे संक्रमणाच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका आव्हानात्मक असणार होती आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत हे सिद्ध केलं.