पाणीपुरी विकणाऱ्या पण भारताच्या १९ वर्षांखालील संघात समावेशाची मजल गाठण्यात यशस्वी झालेल्या यशस्वी जयस्वालला आणखी एक जबरदस्त पण गोड असा आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रिकेटचा गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं यशस्वीला बॅटवर शुभेच्छांसह सही दिली, इतकंच नाही तर बॅटिंगबद्दल चार मोलाचे धडेही दिले. सचिनचा मुलगा अर्जुन हा यशस्वीचा संघातला सहकारी आहे. यशस्वीचा लढा बघितल्यावर त्याची भेट घेण्याची इच्छा असल्याचे सचिननं अर्जुनला सांगितलं आणि यशस्वीला घरी बोलावलं.

मुंबईच्या मैदानाबाहेर पाणीपुरी विकायची, क्रिकेटच्या मैदानातल्या माळ्यांबरोबर रहायचं असं करत करत क्रिकेटचेही धडे गिरवलेल्या व भारतीय संघात निवड झालेल्या यशस्वी जयस्वालची कथा प्रेरणादायी आहे. त्याची दखल खुद्द सचिन तेंडुलकरनं घेतली असून यशस्वी भव असा आशिर्वादही दिला आहे.

अर्जुननं मला स्वत: घरी जा आणि बाबांशी बोल असं सांगितल्याचं यशस्वी म्हणाला. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो परंतु मी खूप नर्व्हस झालो होतो असंही त्यानं म्हटलं आहे. परंतु क्रिकेटचा विषय आला आणि दोघांच्या गप्पा झाल्या व ताण कुठच्या कुठे पळाला. भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं, मोठ्या सामन्याआधी असलेल्या प्रेशरचा सामना कसा करायचा आदी बाबी मी विचारल्या. व ज्या शंका आहेत त्या सगळ्या विचार असं सांगत सचिननंही त्याचं शंकानिरसन केलं व सल्ला दिला.

सचिनसरांनी निकालाचा विचार करू नको आणि फक्त प्रेशरचा मजा घे असं सांगितल्याचं तो म्हणाला. बोलरचं निरीक्षण करत रहा, प्रत्येक बोलर नंतर काय टाकणार आहे याचा अंदाज त्याचं निरीक्षण केल्यानं येतो असा सल्ला सचिनसरांनी त्याला दिला. जोपर्यंत बोलर त्याच्या जागेवर जात नाही तो पर्यंत त्याचं निरीक्षण केलं तर लक्ष केंद्रीत व्हायलाही मदत होते असं सचिननं त्याला सांगितलं.
यशस्वी विशिष्ट पद्धतीनं सारखा बाद होत असल्यावरही सचिननं त्याला यामागचं कारण सांगितलं व त्यात सुदारणा कशी करायची याचा सल्ला दिला असं यशस्वीनं सांगितलं आहे. बोलण्याच्या नादात सचिनसोबत फोटो काढायला आपण विसरल्याचं व ते शल्य असल्याचं यशस्वीनं म्हटलं आहे.