रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेचा पहिला सामना ७ मार्चला वानखेडेवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे जागतिक क्रिकेटमधील दोन महान फलंदाज रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एकमेकांशी लढणार आहेत. भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स या संघांमध्ये ७ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सलामीचा सामना रंगणार आहे, तर अंतिम सामना २२ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई, १३ फेब्रुवारी, २०२० : क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडेल असा सचिन तेंडुलकरच्या इंडिया लिजंड्स आणि ब्रायन लाराच्या वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्यादरम्यानचा अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पहिला सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर ७ मार्च २०२० रोजी होणार आहे. या सीरिजचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर (सीसीआय) २२ मार्च २०२० रोजी खेळला जाईल. सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होतील आणि कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स कन्नड सिनेमा आणि दूरदर्शन या वाहिन्यांवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. वूट, जिओ हे या सीरिजचे डिजिटल पार्टनर्स आहेत.

या स्पर्धेमधील एकूण ११ सामन्यांपैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर, चार सामने नवी मुंबईच्या येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. या सामन्यांची तिकिटे फक्त ‘बुकमायशो’वर उपलब्ध आहेत.

ही ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांमधील माजी क्रिकेटमध्ये होणार आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, ब्रायन लारा, शिवनारायण चंदरपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी ऱ्होड्स, हशिम आमला, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंठा मेंडिस यांच्यासह अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत.

स्पर्धेचे वेळापत्रक

७ मार्च २०२०    भारत वि. वेस्ट इंडिज    वानखेडे (मुंबई)

८ मार्च २०२०    ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका  वानखेडे (मुंबई)

१० मार्च २०२०   इंडिया वि. श्रीलंका       डीवाय पाटील (नवी मुंबई)

११ मार्च २०२०   वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका   डीवाय पाटील (नवी मुंबई)

१३ मार्च २०२०   दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका       डीवाय पाटील (नवी मुंबई)

१४ मार्च २०२०   भारत वि. दक्षिण आफ्रिका       एमसीए स्टेडियम (पुणे)

१६ मार्च २०२०   ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज       एमसीए स्टेडियम (पुणे)

१७ मार्च २०२०   वेस्ट इंडिज वि. श्रीलंका   एमसीए स्टेडियम (पुणे)

१९ मार्च २०२०   ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका    डीवाय पाटील (नवी मुंबई)

२० मार्च २०२०   भारत वि. ऑस्ट्रेलिया    एमसीए स्टेडियम (पुणे)

२२ मार्च २०२०   अंतिम सामना   ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई)

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

थेट प्रक्षेपण : कलर्स सिनेप्लेक्स आणि दूरदर्शन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar and brian lara to face off in road safety world series opener zws
First published on: 14-02-2020 at 00:22 IST