टीम इंडियाचा आक्रमक कॅप्टन विराट कोहलीला ‘तुझं माझं जमेना…’ म्हणत अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी व्यवस्थापक रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड व्हावी, यासाठी विराटनं खास ‘फिल्डिंग’ लावल्याचं बोललं जात होतं. पण रवी शास्त्रींसाठी विराटच नव्हे, तर आणखी एक महान क्रिकेटपटू आग्रही असल्याचं समोर आलं आहे. रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा, यासाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विशेष प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. सचिनच्या विनंतीला मान देऊन शास्त्री आता प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार आहेत. तसं त्यांनी जाहीरही करून टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कडक शिस्तीचे अशी ओळख असलेल्या अनिल कुंबळेंनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी भारताचा स्फोटक फलंदाज सेहवागसह चार ते पाच जणांची नावे चर्चेत आली. पण ही नावेही मागे पडून माजी व्यवस्थापक रवी शास्त्रींचं नाव पुढे आलं. त्यात बीसीसीआयनं प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली. सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेणारे रवी शास्त्री आपण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगत होते. गेल्या वर्षी प्रशिक्षकपदाच्या निवडीवेळी आपल्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याची ‘सल’ त्यांना होती. त्याआधी दोन वर्षे आपण टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी असताना चांगली कामगिरी केली. पण ऐनवेळी आपली निवड करण्यात आली नाही. त्यामुळं आपण प्रशिक्षकपदासाठी इच्छुक नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपण प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार आहोत, असं जाहीर केलं आहे. विराटमुळं या सगळ्या गोष्टी वेगानं घडल्या असं क्रिकेट जगतात बोललं जात होतं. पण आता सचिन तेंडुलकर यानं रवी शास्त्रींनी अर्ज करावा, यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता रवी शास्त्री अर्ज करणार असल्यानं त्यांच्या नावाबाबत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, एवढं मात्र नक्की.

दरम्यान, २०१६ मध्ये सल्लागार समितीनं अनिल कुंबळेंची प्रशिक्षकपदी निवड केली होती. त्यावेळी सचिनसह सौरव गांगुली आणि लक्ष्मण हे या समितीचे सदस्य होते. त्यावेळी व्यवस्थापक असलेल्या रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड होईल, असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण ऐनवेळी कुंबळेंचं नाव समोर आल्यानं अनेकांना धक्का बसला होता. तेंडुलकरही शास्त्रींच्या बाजूने होता. पण सौरव गांगुलीनं अनिल कुंबळेंना पसंती दिली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar steps in to convince ravi shastri for team india coach job
First published on: 29-06-2017 at 10:06 IST