बंदीच्या कारवाईस सामोरे गेलेल्या सरिता देवी या महिला बॉक्सरला केंद्रीय शासनाने पाठबळ द्यावे व तिची कारकीर्द संपणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने केले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर सरिता हिने हे पदक स्वीकारण्यास नकार दिला होता. उपांत्य फेरीच्या लढतीत पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ तिने पदक घेतले व पुन्हा व्यासपीठावर ठेवून दिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने तिच्यावर बंदीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात सचिन याने नुकतेच केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवल यांना पत्र लिहून या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. त्याने म्हटले आहे, एक खेळाडू म्हणून मी सरिताचे दु:ख समजू शकत आहे. पंचांच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ तिने हे कृत्य केले आहे मात्र या कारवाईमुळे तिची कारकीर्दच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने भारतीय ऑलिम्पिक महासंघामार्फत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे पाठपुरावा करीत तिच्यावरील कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करावा. तिला महत्त्वाच्या स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी दिली पाहिजे. तिने झालेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. मंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून सरिताला पुन्हा सन्माननीय स्थान मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. सरिता ही भारतामधील अनेक दुर्भागी खेळाडूंची प्रतिनिधी आहे. तिला योग्य न्याय मिळावा यासाठी शासनाने ठोस प्रयत्न करावेत असेही आवाहन सचिनने केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar urges government to support sarita devi
First published on: 20-11-2014 at 03:15 IST